जगभरात कोरोना महामारीचे १ कोटी ८२ लाख बळी ! – संशोधन
अधिकृत बळी पडलेल्यांची ५९ लाख या संख्येपेक्षा तिप्पट संख्या असल्याचा संशोधकांचा अंदाज !
वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे लक्षावधी लोकांना जीव गमवावा लागला. जागतिक स्तरावर बळी पडलेल्या ५९ लाख या एकूण मृतांच्या संख्येपेक्षा तीन पटींनी अधिक लोक मृत्यूमुखी पडले असल्याचे मत वॉशिंग्टन विद्यापिठातील संशोधकांच्या एका गटाने व्यक्त केले आहे. या गटाने जगातील १९१ देश आणि प्रांत येथील मृतांच्या संख्येचा अभ्यास केला असून ही संख्या १ कोटी ८२ लाख असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
१. संशोधकांनुसार मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येमध्ये केवळ कोरोना विषाणूमुळे नाही, तर हृदय, फुप्फुस आदींच्या विकारांनी आधीपासून ग्रस्त असलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांची स्थिती खालावली आणि ते मृत्यू पावले, अशांचाही यात समावेशही आहे.
२. संशोधनानुसार सर्वाधिक मृत्यू हे दक्षिण अमेरिका, युरोप आणि सब-सहारन आफ्रिका भागातील (आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेत असलेले आफ्रिकी देश) गरीब देशांमध्ये झाले. असे असले, तरी श्रीमंत देशांपैकी इटली आणि अमेरिका येथील काही भागांमध्येही कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या अधिक होती.
३. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू पावलेल्या देशांमध्ये बोलिव्हिया, बुलगेरिया, एस्वाटीनी, नॉर्थ मॅसेडोनिया आणि लिसोथो यांचा समावेश आहे, तर आइसलँड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड आणि तैवान या देशांत सर्वांत अल्प लोक कोरोनाला बळी पडले.