संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्या अर्थाने स्त्रिया सक्षम आणि सुरक्षित होऊ शकतात ! – श्रीमती अलका व्हनमारे, महिला संघटक, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक महिलादिन उत्साहात साजरा
हरीनगर -बेंबळे (जिल्हा सोलापूर), ११ मार्च (वार्ता.) – एका आकडेवारीनुसार २०२१ मधील एका अहवालामध्ये मुलींच्या संदर्भात ३१ सहस्र तक्रारी आल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या स्त्री सुरक्षित नसण्यामागे अनेक कारणे आहेत. शासनाची सेक्युलर मानसिकता, वासनांधता, अश्लीलता, आधुनिकतेच्या नावाखाली चालणारे अपप्रकार, कायद्याची कुणालाही भीती नसणे, संकेतस्थळांवरील अश्लीलता यांसारख्या अनेक कारणांमुळे स्त्रिया सुरक्षित नाहीत. स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की, तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठावर कोणत्या प्रकारची गाणी आहेत ते सांगा. त्यावरून त्या देशाचे भवितव्य काय असेल, ते मी सांगतो. भारतीय संस्कृतीमध्ये केवळ एक दिवस नाही, तर सदा सर्वकाळ स्त्रियांना मानाचे आणि आदराचे स्थान दिलेले आहे. जेथे महिलांचा सन्मान होतो, तेथे देवी-देवता वास करतात, त्यामुळे भारतीय संस्कृतीचे पालन करणे आणि धर्माचरण केल्यास खर्या अर्थाने स्त्रिया सक्षम अन् सुरक्षित होऊ शकतात, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या महिला संघटक श्रीमती अलका व्हनमारे यांनी केले.
१. येथील श्री विठ्ठल बहुउद्देशीय संस्था हरिनगर-बेंबळे संचलित, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तसेच प्रोग्रेसिव्ह प्राथमिक शाळा येथे ८ मार्च या दिवशी जागतिक महिलादिन आणि जागतिक विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीमती अलका व्हनमारे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. प्रियांका विकास अनपट या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती अलका व्हनमारे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
२. या वेळी संस्थेचे सचिव श्री. भजनदास इंगळे यांनी ‘स्त्री आणि तिची कर्तव्ये’ याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. सुप्रिया कीर्ते आणि सौ. नम्रता माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रियंका अनपट यांनी केले. या वेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कीर्ती चौगुले, प्राचार्य श्री. दुर्गानाथ देशमुख यांच्यासह अन्य प्राचार्य आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
क्षणचित्र१. कार्यक्रमाच्या पूर्वी श्रीमती अलका व्हनमारे आणि मान्यवर वक्ते यांचे विद्यार्थींनींनी भारतीय पोशाखामध्ये ढोल आणि लेझीमच्या निनादात मोठ्या उत्साहाने स्वागत केले. २. कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कीर्ती चौगुले यांनी श्रीमती अलका व्हनमारे यांना सांगितले की, पुढील वेळी महाविद्यालयातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही या. ३. श्रीमती अलका व्हनमारे यांनी मांडलेला विषय अनेक पालकांनाही आवडला. |