काँग्रेसला मरणपंथाला लागलेले पहावत नाही ! – गुलाम नबी आझाद

ज्या पक्षाने सातत्याने मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंवर अन्याय केला, मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी राष्ट्रघातकी निर्णय घेतले, त्या पक्षाचे अधःपतन निश्‍चित होते ! काँग्रेसचे अधःपतन पहाण्याची नामुष्की काँग्रेसवाल्यांवर आली आहे. त्यासाठी त्यांनी सिद्ध रहावे ! – संपादक

नवी देहली – ज्या लोकांनी काँग्रेस पक्षासाठी कामे केली आहेत, तिच्या उभारणीच्या कामात स्वतःचे आयुष्य वेचले आहे, त्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष असा मरणपंथाला लागलेला पहावत नाही, असे हताश उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काढले आहेत. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्याचे आझाद यांचे म्हणणे आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘‘या पराभवाविषयी मी आताच काही प्रतिक्रिया देणार नाही; कारण या निकालानंतर मी दुःखी आणि हताश झालो आहे.  उत्तराखंड, गोवा आणि मणीपूर या ३ राज्यांमध्ये काँग्रेसला विजय संपादन करणे सोपे होते. उत्तरप्रदेशातही काँग्रेसला अधिक जागा मिळतील, असे वाटले होते; पण तसे काही झाले नाही. काँग्रेसचा पराभव हा धोक्याचा इशारा आहे. आपसारख्या पक्षाने एवढ्या अल्प वेळेत मोठे यश संपादन करणे आणि काँग्रेसचा २ राज्यांतील दारूण पराभव हे अविश्‍वसनीय आहे. काँग्रेसला सतत पराभवाच्या नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पक्षात मोठे पालट घडून आणण्याची आवश्यकता आहे.’’