कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद असल्यामुळे राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता घसरली !
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद असल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली आहे का ? याविषयी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी ८ मार्च या दिवशी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड वरील माहिती दिली.
राज्यातील इयत्ता १ ली ते ५ वी च्या १ लाख ४७ सहस्र २७७ विद्यार्थ्यांचे शिक्षकांद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये इयत्ता पहिलीतील ३२ सहस्र ८८८ पैकी १२ सहस्र ३०० विद्यार्थ्यांनी अपेक्षित शिक्षण संपादन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादन पातळी वाढण्यासाठी भाषा आणि गणित या विषयांचे ‘ऑनलाईन’ आणि प्रत्यक्ष अभ्यासवर्ग घेण्यात येणार आहेत. यासह १०० दिवसांचा अध्ययनस्तर विकसन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची लेखी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.