देवसरी (जिल्हा यवतमाळ) गावातील ९९ पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसन प्रस्तावाला मान्यता देणार ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
विधानसभा कामकाज तारांकित प्रश्न
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – देवसरी या पूरग्रस्त गावात ५४८ कुटुंबे रहात आहेत. त्यापैकी १८७ कुटुंबे पूरग्रस्त असून त्यापैकी केवळ ९९ कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी सादर केला होता; मात्र शासन निर्णय २३ मार्च १९८४ मधील परिच्छेद सी (३) प्रमाणे पूरबाधित गावातील किमान ७५ टक्के घरांचा समावेश निळ्या रेषेखालील पट्ट्यात होणे आवश्यक आहे. तरच त्या गावाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करू शकतो. देवसरी गावातील ७५ टक्के घरे पूरबाधित नसल्यामुळे शासकीय अटींची पुर्तता होत नसल्याने हा याविषयीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला होता; मात्र १ मासाच्या आत पुनर्वसन अधिकारी यांना हा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील. या प्रस्तावाला मान्यता देऊन ९९ घरांचे पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
७ मार्च या दिवशी आमदार संतोष बांगर यांनी उमरखेड तालुक्यातील देवसरी गावातील पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वरील उत्तर दिले.