मराठी भाषेचे महत्त्व बिंबवा !

पुणे जिल्ह्यातील खानवडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे इंग्रजी माध्यमाच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये रूपांतर करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अनुमती दिली आहे. राज्य सरकारने या शाळेला ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ असे नाव दिले असून शाळेमध्ये पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे वर्ग असणार आहेत.

भाषा म्हटली की, तिची संस्कृती आणि प्रथा येते. त्यामुळेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सूट, बूट, टाय, तसेच मुलींनी टिकली न लावणे, बांगड्या घालून न येणे या गोष्टीही ओघाने येत आहेत. त्यामुळे ‘मराठीचे विस्मरण म्हणजे मराठी संस्कृतीचे विस्मरण’ झाले आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांविषयी काळजी करावी लागणे, हे चिंताजनक आहे. मागील १५ वर्षांत सरकारी धोरणे मराठी शाळांची गळचेपी करून इंग्रजी शाळांचे चांगले होईल, अशी होत आहे. परिणामी मराठी शाळांच्या संस्थाचालकांपुढे शाळा चालवणेच मोठे आव्हान आहे. मराठी शाळा या सरकारी अनुदानावर चालत असल्यामुळे त्यांना विविध सरकारी नियमांचे पालन करावे लागते. अनेक नवीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर शाळेत चाकरीसाठी रूजू झालेले असतात.

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांच्या मते इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढण्यामागे सर्वस्तरीय आणि सर्वदूर पसरलेले अर्थकारण आहे. इंग्रजी माध्यमाचे लाभार्थी पुष्कळ आहेत आणि ते वाढत रहाणारे आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शुल्क वाढले म्हणून आंदोलन करणारे पालक आणि त्या पालकांची मते मिळावीत म्हणून आंदोलनात सहभागी होणारे राजकीय कार्यकर्ते हे दोन्हीही मराठीद्वेष्ट्या व्यवस्थेचेच घटक आहेत. मातृभाषेतून शिक्षण मुलांच्या आकलनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचा निर्वाळा अनेक शिक्षणतज्ञांनी आणि सामाजिक अभ्यासकांनी दिला आहे.

अमृतालाही जिंकणार्‍या मराठी भाषेचे श्रेष्ठत्व विसरून एका परकीय भाषेच्या आहारी जाणे अयोग्य आहे. सरकारने ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्याची औपचारिकता करण्यापेक्षा मराठी शाळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे अधिक सयुक्तिक आहे. पालकांनीही पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून इंग्रजी भाषेच्या आहारी जाण्याऐवजी मुलांना एक भाषा यावी, एवढेच इंग्रजी भाषेचे महत्त्व आहे, हे समजून घ्यावे.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे