रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये भारत सरकारने नागरिकांसाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेचे यश !
भारत सरकारने जोखीम पत्करून ‘ऑपरेशन गंगा’च्या अंतर्गत युक्रेनच्या युद्धभूमीवर अडकलेल्या ९० टक्क्यांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचे कार्य पार पाडले आणि उर्वरित भारतियांना परत आणणे चालू आहे. यासंदर्भात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रामध्ये बोलतांना (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सांगितलेली सूत्रे या लेखात पहाणार आहोत.
१. भारत सरकारने सहस्रो विद्यार्थ्यांना युद्धभूमीवरून स्वदेशात परत आणण्याचे मोठे कार्य पार पाडणे
सध्या रशिया आणि युक्रेन यांची लढाई चालू आहे. त्यांच्या युद्धभूमीवरून भारतियांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम अतिशय जलदपणे राबवण्यात आली. ही मोहीम राबवण्यासाठी या दोन्ही देशांचे सहकार्य आवश्यक होते. आधी युद्धक्षेत्रातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना युक्रेनच्या सीमेपलीकडे असलेल्या पोलंड, रुमानिया किंवा अन्य देशांमध्ये सुरक्षित करण्यात आले. तेथून त्यांना विमानतळापर्यंत आणून नंतर विमानाने स्वदेशात सोडण्यात आले.
त्या ठिकाणी केवळ भारतीयच नाही, तर इतर राष्ट्रांचे मिळून अनुमाने ८० सहस्र विद्यार्थी अडकले होते. असे असतांना भारताने येथे एक चांगली गोष्ट केली की, सरकारने भारतियांना आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री तेथे पाठवले. त्यांचा हुद्दा मोठा असल्यामुळे तेथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता.
२. भारताने विद्यार्थ्यांना आणण्यासाठी नागरी विमानांऐवजी वायूदलाच्या विमानांना प्राधान्य देणे
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी नागरी विमान पाठवणे आणि वायूदलाचे विमाने पाठवणे, असे दोन पर्याय होते; पण भारताने वायूदलाच्या विमानांनी ही मोहीम राबवली. सुटकेची मोहीम राबवतांना एखाद वेळी अचानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि विमान उतरवावे किंवा उडवावे लागले, तर अशी परिस्थिती हाताळण्याचा अनुभव वायूदलाच्या वैमानिकांना बर्यापैकी असतो.
३. वेळेत बाहेर न पडणार्या विद्यार्थ्यांनी संकटातून सोडवणार्या भारत सरकारविषयी कृतज्ञ रहाणे आवश्यक !
जे विद्यार्थी विदेशात शिकायला गेले होते, ते स्वत:ला सरकारचे ‘जावई’ समजतात का ? असा प्रश्न खेदाने विचारावासा वाटतो. ते स्वत:हून पैसे भरून तेथे गेले होते आणि तेथील वकिलातीमध्ये त्यांनी नोंदणीही केली नव्हती. जेव्हा अनेक भारतीय विविध कारणांसाठी विदेशात जातात. तेव्हा त्यांनी तेथील भारतीय वकिलातीमध्ये नोंदणी करणे आवश्यक असते. याचे पालन अनेक भारतीय लोक करत नाहीत. त्यामुळे जेव्हा धोकादायक परिस्थिती उद्भवते, तेव्हा ते नेमके कुठे आहेत, हे आपल्याला शोधावे लागते.
आपली तुलना इतर राष्ट्रांशी केली, तर कोणत्या राष्ट्राने त्यांच्या विद्यार्थ्यांना परत आणले आहे ? प्रत्यक्षात अन्य कोणत्याही राष्ट्रांनी असे प्रयत्न कुणीही केलेले नाहीत. ‘आपण वाचलो आणि आपल्याला विमानाने सुखरूप परत आणण्यात आले’, याविषयी अनेकांच्या मनात कृतज्ञता दिसत नाही. देशाने केवढ्या धोकादायक परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढले, याची त्यांना जाणीव पाहिजे. भारत सरकार विद्यार्थ्यांना संकटातून सोडवत आहे, याविषयी त्यांनी निश्चितच कृतज्ञ असायला पाहिजे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने अतिशय चांगले काम केले आहे. यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना सरकार पर्यायाने देशाचा अभिमान वाटायला पाहिजे.
४. आपत्कालीन परस्थितीत कसे वागायचे याविषयी पालकांनी त्यांच्या मुलांना प्रशिक्षण देणे आवश्यक !
आपत्कालीन परिस्थितीत कसे वागायचे, याविषयी पालकांनी त्यांच्या मुलांना प्रशिक्षण द्यायला हवे. गोळीबार होत असतांना कोणती काळजी घेतली पाहिजे ? अत्यावश्यक असतांनाच बाहेर पडणे अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. युद्धभूमीवर आपण स्वत:ला अधिक दिसलो, तर आपल्यासह इतरांनाही धोक्यामध्ये टाकू शकतो. अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी दूरचित्रवाहिनींवर विविध अनुभव सांगितले. त्यांनी वैयक्तिकरित्या चित्रफिती प्रसारित केल्या. युद्धकाळात असे करणे, हे संबंधित देशासाठी धोकादायक ठरू शकते, याचेही भान असणे आवश्यक आहे. ज्या युक्रेनच्या सुमी भागात अद्यापही ७५० विद्यार्थी अडकले आहेत, त्यांनाही भारताचे नेतृत्व सुरक्षितपणे बाहेर काढेल.
५. भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी भारताने आताच पूर्वनियोजन करावे !
सध्या जगातील १५-२० धोकादायक देशांमध्ये भारतीय रहात आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना सोडवण्याची वेळ आली, तर काय करावे, याविषयी भारत सरकारने आताच पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे.