अवैध पद्धतीने होणार्या गौण उत्खननाचे अन्वेषण करू ! – अब्दुल सत्तार, राज्यमंत्री
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – संगमनेर (जिल्हा नगर) तालुक्यातील आंबी-दुमाला येथील तलाठी कार्यालय बंद असून या गावातील ग्रामस्थांना ७/१२ चा उतारा, तसेच अन्य कागदपत्र यांसाठी अन्य गावात जावे लागते, त्याचप्रकारे या परिसरात अवैध पद्धतीने गौण उत्खनन चालू आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना १० मार्च या दिवशी प्रश्नोत्तरात केला. या संदर्भात उत्तर देतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘यापूर्वी तेथे पूर्णवेळ तलाठी नव्हता; मात्र सध्या तेथे पूर्णवेळ तलाठी आहे. अवैध पद्धतीने होणार्या गौण उत्खननाचे अन्वेषण करू’, असे उत्तर दिले. (स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही अद्याप अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालय नाही, हीच वस्तूस्थिती आहे ! लोकशाहीचे हे ठळक अपयशच नव्हे का ? – संपादक) या संदर्भात शिवसेनेचे आमदार श्री. प्रकाश आबीटकर म्हणाले, ‘‘तलाठी कार्यालय असूनही तेथे उपस्थित असलेला तलाठी प्रत्यक्षात किती काम करतो ? ७/१२ च्या उतार्यांसह अन्य कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालय आणि अन्य कार्यालयांत सामान्य माणसांना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. सामान्यांना जे तलाठी त्रास देतात, त्याविषयी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.’’