शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये एकाच दलालाच्या १ सहस्र १२६ परीक्षार्थींना उत्तीर्ण केले !
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा वर्ष २०१९-२० मध्ये जवळपास ७ सहस्र ८८० अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र केले होते. त्यातील २ सहस्र ७७० परीक्षार्थी हे नाशिक विभागातील असल्याचे आढळून आले आहे, तसेच एका दलालाच्या (एजंट) अनुमाने १ सहस्र १२६ परीक्षार्थींना पात्र केल्याचे सायबर पोलिसांच्या अन्वेषणामध्ये निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मुकुंद सूर्यवंशी यांना सायबर पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
सूर्यवंशी हे शिक्षक असून यातील आरोपी राजेंद्र सोळुंके आणि सूर्यवंशी हे एकाच गावातील आहेत. संतोष हरकळ यांच्याकडून जप्त केलेल्या ‘लॅपटॉप’मधून १ सहस्र २७० परीक्षार्थींची नावे, बैठक क्रमांक, जात अशी नोंद असलेली ‘एक्सेल’ची सूची प्राप्त झाली आहे. हीच सूची ‘जी.ए. सॉफ्टवेअर’ आस्थापनातून जप्त करण्यात आलेल्या संगणकातील सूचीशी पडताळली असता त्यातील १ सहस्र १२६ परीक्षार्थींचे गुण वाढवण्यात आल्याचे अन्वेषणामध्ये सिद्ध झाले आहे.