जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्यावतीने ‘जिजाऊ’ या विषयावर व्याख्यान !
पेण (जिल्हा रायगड), १० मार्च (वार्ता.) – येथील श्री केरेश्वर मंदिर कारावी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आगरी रणरागिणी फाऊंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुष्कळ महिला उपस्थित होत्या. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. समितीच्या सौ. विशाखा आठवले यांनी ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज घडण्यासाठी आधी जिजाऊ घडायला हव्यात !’ या विषयावर व्याख्यान दिले. या वेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. दीपाली भोईर यांनी सौ. आठवले यांचा सत्कार केला.
या वेळी सौ. आठवले म्हणाल्या, ‘‘प्रत्येकाला वाटते की, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवेत; पण शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी जिजाऊ असायला हवी. जिजाऊंनी शिवबांवर लहानवयातच रामायण-महाभारत यातील कथांच्या माध्यमातून अध्यात्म आणि धर्म यांचे संस्कार केले. त्यामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. तसेच आजच्या स्त्रीला करायचे आहे. त्यासाठी घरातील महिलेने जर धर्माचरण केले, तर पूर्ण कुटुंब धर्मपालन करेल. प्रत्येक कुटुंब सुसंस्कारित होईल. आधुनिक युगात स्त्रियांना स्वातंत्र्य हवे आहे; पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. ती स्वतंत्र आहे; पण सुरक्षित आहे का, याचा विचारही व्हायला हवा. आज महिलांवर अत्याचार वाढतच आहेत. याचे कारण धर्मशिक्षणाचा अभाव हे आहे. धर्माचे शिक्षण घेतल्यास धर्मपालन होते. त्यामुळे आपल्यात आत्मबळ निर्माण होऊन आपण कोणत्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊ शकतो. आपल्यासमोर राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांचे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आपणही धर्मप्रेम निर्माण करूया आणि पुढच्या पिढीवर संस्कार करूया.’’