श्री जोतिबा देवाच्या मंदिराची चारही द्वारे उघडण्यासाठी, तसेच ‘ई-पास’ बंद होण्यासाठी आजपासून आंदोलन !
जोतिबा (जिल्हा कोल्हापूर), १० मार्च (वार्ता.) – श्री जोतिबा मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी शुक्रवार, ११ मार्चपासून तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी जोतिबा डोंगर येथील ग्रामस्थ, पुजारी यांनी दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यावर धार्मिक स्थळे पूर्ण क्षमतेने चालू करण्यास सरकारने अनुमती दिली आहे, तरीही जोतिबा डोंगर येथे दर्शनासाठी भाविकांना ‘ई-पास’ बंधनकारक आहे. सध्या जोतिबाचे खेटे (माघ मासातील दर रविवारी भरणारी यात्रा) चालू असून उन्हाचा तडाखाही वाढत आहे. अशा स्थितीत निर्बंध न उठवल्याने, दर्शन रांगेच्या नियोजनाअभावी भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रांगेत घंटोन्घंटे उभे रहावे लागत असल्याने भाविकांचे देवस्थान समितीचे कर्मचारी, पोलीस यांच्या समवेत वाद होत आहेत. हकदार पुजार्यांचीही ‘ई-पास’ बंद करून चारही द्वारे खुली करण्याची मागणी आहे.