रशियाने केलेल्या आक्रमणात युक्रेनमधील प्रसूतीगृह उद्ध्वस्त !

  • १७ जण घायाळ

  • अनेक जण ढिगार्‍याखाली अडकले

घटनास्थळ

लवीव (युक्रेन) – देशाच्या दक्षिण पूर्व भागातील मारियुपोल शहरातील एका प्रसूतीगृहावर रशियाकडून बाँबवर्षाव करण्यात आला. येथे अनेक नवजात बालके आणि त्यांच्या माता यांच्यावर उपचार चालू होते. या आक्रमणात या प्रसूतीगृहाची मोठी हानी झाली. यात १७ जण घायाळ झाले, तर अनेक महिला आणि मुले ढिगार्‍याखाली अडकले आहेत. ‘नागरी वस्ती असणार्‍या ठिकाणांवर आक्रमण करणार नाही’, असे रशियाने यापूर्वी वचन दिले होते; मात्र त्याचे त्याने पालन केले नाही, असे युक्रेनकडून सांगितले जात आहे. मारियुपोल शहरासह राजधानी कीवच्या पश्‍चिमेकडे असलेल्या एका शहरातील दोन रुग्णालयांवरही रशियाकडून बाँबवर्षाव करण्यात आल्याचे वृत्त अल्-जजीरा वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनीही या आक्रमणाचा एक व्हिडिओ ट्वीट करून ‘हे आक्रमण म्हणजे अत्याचार आहे’, असे म्हटले आहे.