आमदार विधानसभेत धिंगाणा घालण्यासाठीच येतात का ?

विधानसभेतून…

आमदार चंद्रकात नवघरे यांचा संतप्त प्रश्‍न

विधानसभेतील एका आमदाराला असे सांगावे लागते, हे सर्वपक्षीय आमदारांना अशोभनीय आहे.

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – लोकांनी आम्हाला समाजात हितकारी कामे करण्यासाठी आम्हाला निवडून विधीमंडळात पाठवले आहे. विधीमंडळात येऊन आम्ही विकासकामांविषयी चर्चा करणे अपेक्षित असते; मात्र सध्या विधानसभेत विकासकामांऐवजी आमदार दुसर्‍याच प्रश्‍नांवरून गोंधळ घालत आहेत. विधानसभेत केवळ धिंगाणा घालण्यासाठीच आमदार येथे येतात का ?, असा संतप्त प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमतचे (लोणावळा) येथील आमदार चंद्रकांत नवघरे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत उपस्थित केला.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत मौजे रुखी (जिल्हा हिंगोली) गावातील नॅशनल रस्ता ते रुखी अंतर्गत रस्ता दुरुस्त करण्याविषयीची लक्षवेधी चर्चेला आली, तेव्हा भाजपचे आमदार विधानसभेत गोंधळ घालत होते. आमदार नवघरे यांनीच ही लक्षवेधी मांडली होती; मात्र गोंधळामुळे त्यांना लक्षवेधीवर बोलता येत नसल्याने त्यांनी वरील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी इतर आमदारांनी नवघरे यांना शांत करून लक्षवेधीवर बोलण्यास सांगितले.