समंजस, प्रेमभाव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. प्रणव चैतन्य तागडे (वय ९ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. प्रणव चैतन्य तागडे हा या पिढीतील एक आहे !
पुणे येथील कु. प्रणव चैतन्य तागडे याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. प्रणव चैतन्य तागडे उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. आता साधनेचे अपुरे प्रयत्न आणि तीव्र त्रास यांमुळे त्याची आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिली आहे. त्याच्यावर नियमितपणे उपाय आणि योग्य संस्कार केल्यास त्याचे स्वभावदोष आणि त्याच्यावर आवरण असल्यास ते न्यून होईल अन् त्याची पातळी पुन्हा वाढेल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
सौ. श्वेता तागडे (प्रणवची आई), पुणे
१. प्रेमभाव
‘प्रणव खेळतांना मुलांशी जुळवून घेतो. तो खेळून घरी आल्यावर कुणाविषयीही गार्हाणे करत नाही. त्याच्यातील प्रेमभावामुळे तो आम्ही रहात असलेल्या संकुलातील सर्वांचा लाडका आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
वर्ष २०२० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ सोहळा पहात असतांना प्रणवने ४ – ५ वेळा साष्टांग दंडवत घातला. आम्ही त्याला त्याविषयी विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘आता इथे प.पू. आजोबा (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत.’’
श्री. चैतन्य तागडे (प्रणवचे वडील, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), पुणे
१. शिकण्याची वृत्ती
‘प्रणव वयाच्या ७ व्या वर्षापासून तबला वाजवायला शिकत आहे. वर्गात एका गटाचे (बॅचचे) शिकवणे पूर्ण होईपर्यंत त्याला थांबून रहावे लागते. त्याच्या तबला शिकवणार्या गुरुजींनी सांगितले, ‘‘सगळे विद्यार्थी मागे बसल्यावर एकमेकांशी बोलत असतात; मात्र प्रणव गप्पा न मारता ‘मी अन्य विद्यार्थ्यांना काय शिकवत आहे आणि ते तबला कसा वाजवत आहेत ?’, हे एकाग्रतेने पहात असतो. त्याची ही कृती मला फार आवडते.’’ त्याला नवीन गोष्टी शिकायला आवडतात.
२. प्रणवमध्ये जाणवलेले पालट
२ अ. स्थिरता येणे : सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथील बालसाधक अन् त्यांचे पालक यांसाठी सप्ताहात एकदा ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. त्या वेळी त्या ‘बालसाधकांनी सप्ताहात व्यष्टी साधनेचे कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी सांगतात. या सत्संगामुळे प्रणवचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित होत आहेत. त्याच्यात स्थिरता आली आहे.
२ आ. प्रांजळपणा वाढणे : एकदा प्रणवच्या आईने त्याला खोटे बोलण्यावरून शिक्षा केली होती. दुसर्या दिवसापासून त्याने आईला प्रामाणिकपणे आढावा देण्यास आरंभ केला. आता तो प्रतिदिन त्याच्या आईला ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न, अभ्यास काय केला आणि वेळ कुठे वाया घालवला ?’, या सूत्रांचा प्रांजळपणे आढावा देतो. त्याच्यातील ‘खोटे बोलणे’ या स्वभावदोषात गुरुकृपेने अल्प कालावधीत पालट झाला आहे.’
श्री. अमोल मेहता (प्रणवचे मामा), पुणे
समंजस
अ. ‘प्रणवचे आई-वडील आणि मी कारखान्यातील कामे, तसेच सेवा यांत व्यस्त असतो. तेव्हा ‘मला वेळ द्यावा’, अशी प्रणवची अपेक्षा नसते. तो आमची व्यस्तता समजून घेतो.
आ. एकदा प्रणव आमच्या घरी आला होता. नंतर मी त्याला त्याच्या घरी पोचवायला गेलो. तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. त्या वेळी त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा घरी नव्हते. त्या वेळी माझ्या मनात ‘घरी कुणी नसल्याने त्याला एकटे कसे ठेवू ?’, असा विचार आला. तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मामा, मी एकटा कुठे आहे ? प.पू. आजोबा (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत ना !’’ तेव्हा त्याची एकटे थांबायची सिद्धता होती.’
प्रणवचे स्वभावदोष
‘अव्यवस्थितपणा, हट्टीपणा आणि चालढकलपणा
कृतज्ञता
‘प.पू. गुरुमाऊली, केवळ आपल्याच कृपेने आम्हाला या दैवी बालकाला घडवण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत. या जिवाला घडवण्यासाठी सद्गुरु आणि संत यांचा सत्संग मिळत आहे. या सत्संगाचा आम्हाला आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या चरणी अनन्य शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. श्वेता तागडे
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १०.१.२०२२)
आध्यात्मिक स्तरावर साजरा झालेला कु. प्रणव चैतन्य तागडे याचा व्रतबंधन सोहळा !
‘१६.१२.२०२० या दिवशी कु. प्रणवची मुंज झाली. ‘मुंजीतील विधींचा त्याला लाभ व्हावा’, या हेतूने आमच्याकडून पुष्कळ प्रार्थना झाल्या. मुंजीतील विधींचे महत्त्व सांगून प्रणवकडूनही प्रार्थना करवून घेतल्या. त्या वेळी प्रणवच्या आई-वडिलांना जाणवलेली सूत्रे आणि प्रणव अन् त्याची आजी यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सौ. श्वेता तागडे आणि श्री. चैतन्य तागडे (प्रणवचे आई-वडील), पुणे
१. ‘परात्पर गुरुदेव प्रत्येक प्रत्येक विधी करवून घेत आहेत’, असे प्रणवला जाणवणे : ‘परात्पर गुरुदेव प्रत्येक विधी करवून घेत आहेत’, असे प्रणवला जाणवले. त्यामुळे विधी चालू असतांना त्याने कोणतेही गार्हाणे न करता गुरुजी सांगतील, तसे केले.
२. बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केल्यावर ‘भगवान श्रीविष्णूच्या चरणांवर डोके ठेवले’, असे प्रणवला जाणवणे : प्रणवच्या मुंजीच्या वेळी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) यांची वंदनीय उपस्थिती लाभली. प्रणवने त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. त्या वेळी प्रणवला ‘भगवान श्रीविष्णूच्या चरणांवर डोके ठेवले’, असे जाणवले.
३. प्रणवची विधीतील एकाग्रता पाहून आणि स्पष्ट मंत्रोच्चार ऐकून गुरुजींनी त्याचे कौतुक करणे : प्रणवची विधीतील एकाग्रता पाहून आणि स्पष्ट मंत्रोच्चार ऐकून गुरुजी म्हणाले, ‘‘या बटूला आमच्या समवेत शिकण्यासाठी पाठवा. अन्य मुले मुंज चालू असतांना इतक्या एकाग्रतेने विधी करतांना दिसत नाहीत. याने तुम्हाला विधीच्या वेळी काहीच त्रास दिला नाही.’’
सौ. अनुराधा तागडे (प्रणवची आजी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६६ वर्षे)
१. ‘प्रणवच्या मुंजीतील विधी पहातांना उपस्थित सर्वांची भावजागृती होत होती.
२. प्रणवकडे पाहून श्रीविष्णूच्या (श्रीविष्णूचा वामन अवतार) बटू रूपाचे दर्शन होत होते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १०.१.२०२२)