मालेगाव येथे बोगस प्रस्ताव सिद्ध करून करण्यात आले हानीभरपाईच्या निधीचे वाटप !
१ मासात चौकशी करून कारवाई करण्याची मंत्र्यांचे आश्वासन !
भ्रष्टाचारग्रस्त प्रशासन !
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – प्रत्यक्षात पीक हानी झालेल्या शेतकर्यांची हानी भरपाईची रक्कम ६ कोटी रुपये असतांना मालेगाव येथे बोगस प्रस्ताव सिद्ध करून निकषात न बसणार्या शेतकर्यांना ४४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. शासकीय स्तरावर असे बोगस प्रस्ताव सिद्ध करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. याविषयी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी १ मासात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन १० मार्च या दिवशी विधान परिषदेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. भाजपचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी हा सुनियोजित आणि संघटित गुन्हा असल्याचे नमूद करत अहवाल येईपर्यंत संबंधित अधिकार्यांना निलंबित करण्याची मागणी केली. यावर उत्तर देतांना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘या प्रकरणी शासनाकडे काही तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींवर चौकशी केल्यानंतर हानी झालेली नसून त्यांना पैसे मिळाले असल्याचा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी दोषी अधिकार्यांना पाठीशी घातले जाणार नाही.’’