शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या उपस्थित केलेल्या सूत्रावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ !
विधानसभेचे कामकाज ३० मिनिटांसाठी स्थगित !
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्नोत्तराच्या घंट्यात ‘वर्ष २०२१ मधील पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेले भाजपचे १२ आमदार कोणत्या नियमानुसार सभागृहात उपस्थित राहिले ? त्यांना सभागृहात कसे काय घेतले ?’, असे प्रश्न उपस्थित केल्यावर भाजपच्या सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. काही सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ केला. गदारोळ वाढल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ३० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. (चर्चा करून जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा गोंधळ घालून सभागृहाचा वेळ आणि जनतेचा पैसा वाया घालवणारे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? यावरून लोकप्रतिनिधींना प्रथम नैतिकतेचे शिक्षण देणे किती आवश्यक आहे, हेच दिसून येते ! – संपादक)