सरकार भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून लक्ष्य करत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्हद्वारे पुरावे सादर केले !

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – राज्याचे विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण हे सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र भाजपातील प्रमुख नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना अटक करायचे काम करत आहे. त्यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी विधानसभेत ८ मार्च या दिवशी २९३ प्रस्तावावर चर्चा करतांना उघड केली. विशेष अधिवक्ता प्रवीण चव्हाण खोटे गुन्हे नोंद करणे, खोटे पंचनामे सिद्ध करणे याचे नियोजन करत असल्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ असलेले पुरावे त्यांनी पेनड्राईव्हमधून विधानसभा अध्यक्षांना दिले.

माझ्यासह भाजपचे गिरीश महाजन यांच्या विरोधात कसे कारस्थान शिजले ?, याचे कारागृहात आणि बाहेर असलेल्या लोकांचे १२५ घंट्यांचे ध्वनीमुद्रण माझ्याकडे आहे. एवढे पुरावे आहेत की, त्यातून २५ वेबसिरीज सिद्ध होतील, असे फडणवीस या वेळी म्हणाले. फडणवीस एकेक गौप्यस्फोट करत होते, तसतशी सभागृहात पुष्कळ शांतता पसरली होती. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना पुराव्यांचा ‘पेनड्राईव्ह’च दिला. ‘‘यावर कोण कारवाई करेल ? राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि पोलीस यांचा यात सहभाग आहे. त्यामुळे हा खटला सीबीआयकडे द्यावा. आम्हाला संपवण्यासाठी असा कट शिजत असेल, तर शेवटी आरपारची लढाई लढावी लागेल’’, असे फडणवीस या वेळ म्हणाले.

माझा कोणत्याही प्रकरणाशी संबंध नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्हच्या माध्यमातून विविध पुरावे सादर केल्यावर या प्रकरणी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘‘राज्यात भाजपचे सरकार गेल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. मी त्यांनी केलेल्या आरोपांच्या खोलात गेलेलो नाही. या प्रकरणात माझे जरी नाव घेतले गेले असले, तरी माझा कोणत्याही प्रकरणाशी संबंध नाही.’’

या पेनड्राईव्हमधील ऑडिओ किंवा व्हिडिओ यात पुढील सूत्रांचे संवाद आहेत.

१. विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांच्या संवादाचे ऑडिओ आले आहेत. ते पुष्कळ गंभीर आहेत. यात गिरीश महाजन यांच्याविषयी अमली पदार्थाच्या संदर्भात संशय निर्माण करून त्यांच्यावर मोक्का लावण्याच्या संदर्भातील नियोजनाचा विस्तृत संवादाचा ऑडिओ आहे. या कटात त्यात शरद पवार यांसह अनेक मंत्री सहभागी आहेत. सरकारी अधिवक्ता स्वतः तोंडाने सांगतात. महाविकास आघाडीचे सुनील गायकवाड आणि रवींद्र शिंदे यांचे एकनाथ खडसे यांच्याशी बोलणे झाले की, गिरीश महाजन यांना फसवायचे.

२. यात ‘पवार साहेब’ असा उल्लेख असलेले संवाद आहेत.  त्यांच्या नावाचा उल्लेख अधिक वेळा आला आहे, त्यासह अन्य अनेक नेत्यांची नावेही यात आहेत.

३. अनिल देशमुख यांच्या नावाचा अनेक वेळा उल्लेख आहे. अधिकारी नेत्यांना अडकवण्यास सिद्ध नाहीत, अशा आशयाचे संवाद यात आहेत. ‘‘ शेवटी पवार साहेबांना सांगून अधिकारी पालटला. अनिल देशमुख असते, तर लाभ झाला असता.  ‘अजित पवार साहाय्य करत नाही. पर बडे साब सब देख रहे है ।’’ असा संवाद या पेनड्राईव्हमध्ये आहे.

४. अधिवक्ता प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी (साहाय्यक पोलीस आयुक्त) सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण यात आहे. ‘रेड’मध्ये सहभागी होणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. सरकारचे रेस्टहाऊसही बुक करून दिले आहे. जेवण, रहाणे, रोख पैसे घेणे, याविषयी, तसेच ‘खडसे साहेबांचे साहाय्य घ्या, ते सर्व पैसे देतील’, असेही त्यांनी सांगितले.

५. एक चाकू रक्त लावून तेथे ठेवण्याच्या संदर्भातील उल्लेख यात असून अनेक नेत्यांनी ही सर्व केस चालवण्यासाठी पवार साहेबांना पत्र दिल्याचेही या संवादात म्हटले आहे.

६. ‘गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी सीपी (पोलीस कमिशनर)ला काढण्याविना पर्याय नाही. ते मोक्का लावायला सिद्ध नव्हते. स्वत: अभ्यास करून कलमे लावली. अनेक कलमे लावली; पण त्यांनी पॅरेच्या पॅरे गहाळ केली. अनिल देशमुखांनी स्थानांतरामध्ये २ वर्षांत २५० कोटी रुपये तरी कमावले असतील. काय लागते. बिल्डर्सकडून २००-३०० कोटी सहज जमा केले असतील. अनिल देशमुख आपल्या कामी आला असता’, असे त्यात म्हटले आहे.

७. ‘मी साहेबांचा माणूस; पण माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवत नाही, कधी स्टेट्स ठेवत नाही’, असेही यात म्हटले आहे.

८. ‘राजकारण करायचे असेल, तर आर्थिक गुन्हे शाखा आपल्या हाती असाव्यात. एक अधिवक्ता मुंबई येथे आहे. त्या न्यायाधिशांना ‘मॅनेज’ करतात, तिलाच हे काम द्या. सातभाईने छगन भुजबळ यांना पैसे घेऊन सोडवले. सीएम् फाऊंडेशनचा गुन्हा सोलापूरमध्ये नोंद करत आहे. भाजपला १० कोटी रुपयांची देणगी मिळाली, याची तक्रार करा. यामुळे नवाब मलिक यांची चौकशी थांबेल. हे अधिवक्ता अनिल गोटे यांना सांगतात की, जोरदार आरोप करा. आरोप खोटे निघाले, तर मी संपत्ती दान करीन’, अशा स्वरूपाचे काही संवादही फडणवीस यांनी वाचून दाखवले.