वानवडी (जिल्हा पुणे) येथे इसिसशी संबंधांच्या संशयावरून ‘एन्.आय.ए.’कडून एका धर्मांधाच्या घरी धाड, ४ धर्मांधांना अटक !
गुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये धर्मांधांचा वाढता सहभाग
‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ? – संपादक
पुणे – आतंकवादी संघटना ‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) कोंढव्यातील वानवडी परिसरातील तल्हा लियाकत खान याच्या घरी धाड टाकून काही कागदपत्रे आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स वस्तू’ जप्त केल्या. या प्रकरणाचे अन्वेषण एन्.आय.ए.कडून करण्यात येत आहे. गेल्या २-३ दिवसांपासून एन्.आय.ए.चे पथक पुण्यात असून खान याची चौकशी चालू असल्याची माहिती एन्.आय.ए.कडून देण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून, तसेच देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या सिद्धतेत असल्याच्या संशयावरून देहली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) ८ मार्च २०२० या दिवशी देहलीतून जैनब वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग या काश्मिरी दांपत्याला अटक केली होती. हे प्रकरण एन्.आय.ए.कडे अन्वेषणासाठी वर्ग करण्यात आले. त्यांच्या चौकशीत चौघा जणांची नावे पुढे आली होती. त्यानंतर देहली पोलिसांनी अब्दुला बासीत, सादिया शेख, नबील खत्री, अब्दुर रहमान उपाख्य डॉ. ब्रेव्ह यांना अटक केली होती.
समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करण्याचे उद्दिष्ट !
आतापर्यंत या प्रकरणात ६ जणांच्या विरोधात एन्.आय.ए.ने न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले आहे. इसिससाठी काम करणार्यांसाठी गट स्थापन करून त्याद्वारे भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करणे हे काम या गटाचे होते. शस्त्रे गोळा करण्यासाठी निधी उभारणे आणि हत्या घडवून आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
तांत्रिक पुराव्यांवरून ताल्हा एन्.आय.ए.च्या जाळ्यात !
अटक केलेल्यांपैकी सादिया शेख हिच्या संपर्कातील नाबील सिद्दिकी हा ताल्हा खान याच्याशीही जोडला गेला असल्याचे एन्.आय.ए.च्या चौकशीत समोर आल्याने खान याच्या घरी धाड टाकण्यात आली. सिद्दिकी आणि ताल्हा खान हे पुण्यातील विमाननगर परिसरातील एका शिपिंग आस्थापनात कामाला होते. त्या ठिकाणी दोघांची ओळख झाली होती. मात्र दीड वर्षापूर्वी सिद्दिकीला एन्.आय.ए.ने अटक केली. त्याच्याकडील तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केल्यानंतर ताल्हा खानचे नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सादिया शेखच्या संपर्कात अनेक जण
सादिया शेख ही पुण्यातील कोंढवा भागात रहात असून ती अल्पवयीन असल्यापासूनच तिला इसिस संघटनेचे आकर्षण होते. सामाजिक माध्यमांतून ती संघटनेशी जोडली गेली होती. त्याकरता जम्मू-काश्मीर येथे ती पळून गेली होती; परंतु वर्ष २०१६-१७ मध्ये पोलिसांनी तिचा शोध घेत तिचे समुपदेशन करून तिला सोडून दिले होते; मात्र त्यानंतरही ती आतंकवादी संघटनांच्या संपर्कात राहून वेगवेगळ्या कारवायांत सहभागी होती. अखेर देहली येथे एन्.आय.ए.च्या पथकाने तिला अटक केली होती.