प.पू. दास महाराज यांनी ध्यानाविषयी सांगितलेली सूत्रे
१. प.पू. दास महाराज यांना ध्यानावस्थेत दिसत असलेली दृश्ये
१ अ. ध्यानावस्थेत असतांना प्रथम आराध्य देवतेचे चित्र दिसणे, नंतर प.प. भगवान श्रीधरस्वामी आणि रामनाथी आश्रमात आल्यावर परात्पर गुरु डॉक्टर अन् त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे : ‘मी ध्यान लावायला आरंभ केल्यावर माझ्या डोळ्यांसमोर आराध्य देवतेचे चित्र उभे रहायचे. त्यानंतर मला माझे गुरु प.प. भगवान श्रीधरस्वामींचे ध्यानावस्थेतील दर्शन घडले. रामनाथी आश्रमात आल्यावर मी ध्यान लावले. त्या वेळी मला सनातन संस्थेच्या गुरु परंपरेतील प्रथम परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले. त्यानंतर मला प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाले. मी इथपर्यंतच पोचलो आहे. मला पुढची गुरुपरंपरा, म्हणजे अनंतानंद साईश, चंद्रशेखरानंद स्वामी यांचे अजून दर्शन झाले नाही.
यापूर्वी मला प.प. भगवान श्रीधरस्वामी आणि त्या गुरु परंपरेचे दर्शन घडायचे, म्हणजे आमचे ‘आदिनारायण म्हणजे विष्णु, ब्रह्मा, वसिष्ठ, राम, मारुति, रामदासस्वामी, श्रीधरस्वामी’ ही माझी पहिली गुरुपरंपरा होती.
१ आ. ध्यानावस्थेत प्रकाश दिसणे आणि नंतर कुलदेवतेचे दर्शन होणे : मला ध्यानात प्रथम पांढरा प्रकाश दिसतो. त्यानंतर रंग पालटतो आणि आकाशी रंगाचा प्रकाश दिसतो. नंतर मला गुलाबी आणि भगवा या रंगांचे प्रकाश दिसतात. भगवा म्हणजे त्याग. त्यानंतर मी कुलदेवतेचे स्मरण करतो. कुलदेवतेचे ध्यान लावल्यावर मला कुलदेवता तुळजाभवानीचे दर्शन घडते. काही वेळा मी ध्यानात गुरुस्मरण करतो. वर्ष २००० पूर्वी मी ध्यान लावले असतांना मला प.प. भगवान श्रीधरस्वामींची आकृती दिसायची. त्या वेळी मी प्रतिदिन सराव करायचो.
२. बांदा (सावंतवाडी) येथे आल्यावर ध्यानसाधना अल्प होणे, वडील आल्यावर त्यांनी ध्यान लावले असता त्यांना पिशाच्च दिसणे आणि त्याने वडिलांना त्रास देणे
आम्ही कर्नाटकातून महाराष्ट्रात बांदा (सावंतवाडी) येथे रहायला आलो. तेव्हा माझी साधना न्यून झाली, ध्यानाचा सराव न्यून होऊ लागला; कारण आमचा दूध आणि शेती यांचा व्यवसाय होता. ध्यानाचे जे टप्पे मला शिकवले होते, ते पूर्ण होत नसत. माझे ध्यान बंद पडू लागले. त्यानंतर माझे वडील तेथे आले. त्यांनी ध्यान लावायला आरंभ केला. त्या वेळी त्या जागेत पिशाच्च होते. वडील ध्यानाला बसल्यावर पिशाच्च त्यांच्यापासून ८ – १० फुटांवर येऊन वडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. महाराज (वडील) जेथे ध्यानाला बसायचे, तेथे ते पिशाच्च मान लांब करून गिधाडाप्रमाणे त्यांच्या तोंडाला तोंड लावण्याचा प्रयत्न करायचे. त्या गिधाडाचे रूप दिसायचे. नंतर त्याच रूपातून राक्षसाचे रूप दिसायचे. त्या वेळी बांद्यात मी आणि वडीलच होतो. माझी आई तेथे आली नव्हती.
३. मी रामनाथी आश्रमात आल्यावर साधकांसाठी नामजप करतांना ध्यान लावल्यावर मला वाईट शक्ती दिसत नाहीत. मला परात्पर गुरु डॉक्टरांचेच दर्शन होते. अन्य काही दिसत नाही.’
– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |