गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्याचा कट, तर मला संपवण्याचा प्रयत्न !

  •  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट !

  • आता आरपारची लढाई लढावी लागणार असल्याचे प्रतिपादन

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – माझ्यासह भाजपचे नेते गिरीश महाजन यांना संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. आमच्याविरुद्ध खोटे पुरावे सिद्ध असतील, तर ही लोकशाही आहे का ? आम्हाला संपवण्याच्या कारस्थानाचे पुरावे माझ्याकडे आहेत. माझ्यासह भाजपचे गिरीश महाजन यांच्या विरोधात कसे कारस्थान शिजले ?, याचे कारागृहात आणि बाहेर असलेल्या लोकांचे १२५ घंट्यांचे ध्वनीमुद्रण माझ्याकडे आहे. एवढे पुरावे आहेत की, त्यातून २५ वेबसिरीज सिद्ध होतील, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा करतांना केला.
ते पुढे म्हणाले की,…

१. आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारने कट रचला. त्यात शरद पवार यांसह अनेक मंत्री सहभागी आहेत. (या संदर्भातील ‘ऑडिओ क्लिप’ त्यांनी सभागृहात सादर केली. फडणवीस एकेक गौप्यस्फोट करत होते, तसतशी सभागृहात पुष्कळ शांतता पसरली होती. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना पुराव्यांचा ‘पेनड्राईव्ह’च दिला. त्यानंतर सभागृहात निवेदन करतांना त्यांनी पोलखोल केली.)

२. गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लागावा, यासाठी राज्य सरकारने सरकारी अधिवक्त्यांना हाताशी धरून खटाटोप केला. त्यात पोलिसांचाही सहभाग आहे. हे सर्व कुंभांड रचण्यात आले. सरकारी अधिवक्त्याने एफ्.आय.आर्. लिहिला आहे. जबान्या त्यांनी पाठ केल्या. हे सर्व सरकारी अधिवक्ता स्वतः तोंडाने सांगतात. महाविकास आघाडीचे सुनील गायकवाड आणि रवींद्र शिंदे यांचे एकनाथ खडसे बोलणे झाले की, गिरीश महाजन यांना फसवायचे. अजित पवार सहकार्य करत नाहीत; पण मोठे साहेब सर्व पहात आहेत. अशा संवादाचे व्हिडिओ त्यात आहेत.

(अधिवक्ता प्रवीण चव्हाण कट कसा रचत आहेत, याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. ‘सूट बुक केला. व्हेज-नॉनव्हेज जेवण करायचे का ? साहाय्य लागेल, तर खडसेसाहेबांचे घ्या’, असे काही संवादही त्यांनी वाचून दाखवले. हे षड्यंत्र सरकारमधील काही व्यक्तींनी आमच्या विरोधात रचले आहे, असा आरोपही त्यांनी केला. गिरीश महाजन यांच्यावर बनावट खटले पुरावे माझ्याकडे आहेत.)

पोलीस दलाचा अपवापर होत आहे !

‘पोलीस विभागाची देशात ख्याती; पण पोलीस दलाचा अपवापर होत आहे. गिरीश महाजन यांचे थेट नाव येईल, असा प्रयत्न करा. राजकारण करायचे असेल, तर आर्थिक गुन्हे शाखा आपल्या हाती असाव्यात. एक अधिवक्ता मुंबई येथे आहे. त्या न्यायाधिशांना ‘मॅनेज’ करतात, तिलाच हे काम द्या. सातभाईने छगन भुजबळ यांना पैसे घेऊन सोडवले. सीएम् फाऊंडेशनचा गुन्हा सोलापूरमध्ये नोंद करत आहे. सातभाईने छगन भुजबळ यांना पैसे घेऊन सोडले. भाजपला १० कोटी रुपयांची देणगी मिळाली, याची तक्रार करा. यामुळे नवाब मलिक यांची चौकशी थांबेल. हे अधिवक्ता अनिल गोटे यांना सांगतात की, जोरदार आरोप करा. आरोप खोटे निघाले, तर मी संपत्ती दान करीन’, अशा स्वरूपाचे काही संवादही फडणवीस यांनी वाचून दाखवले.

आता आरपारची लढाई लढणार !

फडणवीस म्हणाले की, आम्ही हवेत बोलत नाही. हे साधे पुरावे नव्हेत, तर व्हिडिओ क्लिप आहेत. यावर कोण कारवाई करेल ? राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि पोलीस यांचा यात सहभाग आहे. त्यामुळे हा खटला सीबीआयकडे द्यावा. आम्हाला संपवण्यासाठी असा कट शिजत असेल, तर शेवटी आरपारची लढाई लढावी लागेल. तुम्ही फक्त कांगावा करता; मात्र आम्ही प्रत्यक्षात पुरावे देत आहोत.