आनंदी, प्रेमळ आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणारे पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विश्वास रामचंद्र नाईक (वय ७७ वर्षे) !

श्री. विश्वास नाईक

श्री. प्रवीण विश्वास नाईक (मुलगा), कोथरूड, पुणे.

श्री. प्रवीण नाईक

१. आनंदी : ‘बाबा नेहमी वर्तमानकाळात रहात असल्याने सतत आनंदी असतात. त्यांना न मिळालेल्या कोणत्याही गोष्टीचे ते दुःख करत नाहीत.

२. प्रेमभाव : ते कधीही कुणाला दुखावत नाहीत. काही वेळा त्यांचे कुणाशी मतभेद झाले, तरीही ते विसरून बाबा पुन्हा त्यांच्याशी प्रेमाने वागतात.

३. ‘आपल्याला कुणी मान द्यावा’, असे त्यांना वाटत नाही.

४. आसक्ती नसणे : बाबांचे कल्याण (जिल्हा ठाणे) येथे घर होते. त्यांना ‘ते घर विकून आपण दुसरीकडे घर घेऊया का ?’, असे विचारल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. खरेतर त्यांचे बराच काळ कल्याण येथे वास्तव्य होते, तरीही ‘त्यांना तेथील घराविषयी आसक्ती नव्हती’, असे लक्षात आले.

५. परिस्थिती स्वीकारणे : देवाच्या कृपेने बाबांचे शरीरस्वास्थ्य चांगले आहे. आतापर्यंत ते कधीही रुग्णाईत झाले नाहीत. त्यांना कोरोना झाल्यावर प्रथमच रुग्णालयात रहावे लागले. बाबांचे त्याविषयी काहीच गार्‍हाणे नव्हते अथवा त्यांच्या मनावर ताणही नव्हता. ते १२ दिवस रुग्णालयात एकटेच होते. आम्हाला त्यांची काळजी वाटायची. त्यांची विचारपूस केल्यावर ते आम्हाला सांगायचे, ‘‘मी छान आहे. नामजप करत आहे.’’

६. कृतज्ञताभाव : एकदा मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही कसे प्रयत्न केलेत ?’, त्याविषयी लिहा.’’ तेव्हा ते म्हणाले ‘‘आपण काहीच करत नाही. देवच सर्व करतो. आपण देवाचे नाव घ्यायचे.’’

७. जाणवलेले पालट

अ. पूर्वी त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडायचे. आता मात्र त्यांची अशी काही आवड-नावड राहिली नाही.

आ. ‘बाबांच्या मनात विचारांचे प्रमाण अल्प असते’, असे मला जाणवते.

इ. वेळ लागला, तरी चालेल; पण योग्य कृती करण्याकडे त्यांचा कल असतो. ‘ते अध्यात्म जगत आहेत’, असे जाणवते.

परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला त्यांचा सहवास मिळत आहे. आम्ही त्यांच्याकडून शिकण्यात न्यून पडत आहोत. ‘त्यांच्यातील गुण आमच्यात येण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’

सौ. रश्मी प्रवीण नाईक (सून, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), कोथरूड, पुणे.

सौ. रश्मी नाईक

१. ‘बाबा नेहमीच उत्साही असतात. ते सर्व सेवा मनापासून करतात.

२. सुनेला घरकामात साहाय्य करणे : ‘बाबा मला घरकामांत पुष्कळ साहाय्य करतात. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून बरे झाल्यावर त्यांना ‘विश्रांती घ्या’, असे सांगितले, तरीही ते मला भाजी निवडून देतात.

३. रुग्णाईत पत्नीची सेवा करणे : वर्ष २००३ मध्ये आई (सासूबाई, (कै.) सौ. वासंती विश्वास नाईक) रुग्णाईत होत्या. तेव्हा त्यांना रुग्णालयात भरती केले होते. त्यांचे पोटाचे शस्त्रकर्म झाले होते. नंतर त्यांना एक मास चिकित्सालयात जावे लागायचे. त्या काळात बाबांनी आईंची (पत्नीची) पुष्कळ सेवा केली. आम्ही दोघे नोकरी करत असल्याने सासूबाईंजवळ तेच असायचे.

४. सेवेची तळमळ

अ. कुणाला सनातनची सात्त्विक उत्पादने हवी असल्यास बाबा त्यांना ती तत्परतेने नेऊन देतात. ते दिवसातून २ – ३ वेळाही सात्त्विक उत्पादने द्यायला जातात.

आ. पूर्वी ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी सहसाधक नसले, तरीही बाबा मात्र ठरलेल्या वेळेत प्रदर्शन लावायचे. त्यांची ‘कुणी साहाय्याला यावे’, अशी अपेक्षा नसायची. ते अनेक वेळा सगळे साहित्य एकटे घेऊन जायचे.

इ. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण आवडीने करतात. अन्य साधकाला काही अडचण असल्यास ते स्वतःकडे असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करून झाल्यावर त्या साधकालाही साहाय्य करतात. बाबांना ‘आता तुमचे वय झाले आहे. एवढे एकदम करू नका’, असे सांगावे लागते.

ई. बाबांनी समाजातील त्यांच्या संपर्कातील सगळ्या व्यक्तींना जोडून ठेवले आहे.’

श्री. प्रवीण विश्वास नाईक (मुलगा) आणि सौ. रश्मी प्रवीण नाईक (सून)

१. भावपूर्ण देवपूजा करणे : ‘बाबा पहिल्यापासून घरातील देवपूजा नियमितपणे आणि सर्व स्तोत्रे म्हणत करतात. त्यामुळे घरात नेहमी प्रसन्न आणि शांत वाटते.

२. प.पू. (कै.) आबा उपाध्ये यांच्या घरी पूजा आणि अन्य सेवा मनापासून करणे : वर्ष २०१७ ते २०१९ या कालावधीत बाबा पुणे येथील थोर संत प.पू. (कै.) आबा उपाध्ये यांच्याकडे महत्त्वाच्या सणांच्या दिवशी पूजा करायला जात असत. ते प.पू. आबांच्या घरातील देवपूजा मनापासून करायचे. बाबांना प.पू. आबांच्या घरची पूजा करून घरी यायला दुपारचे ४ वाजायचे. त्यानंतर ते जेवत असत. ते प.पू. आबांकडे गेल्यावर त्यांना काय हवे-नको, ते विचारून त्यांना आणून देत. प.पू. आबा बाहेरगावी गेल्यास बाबा त्यांच्या घराची किल्ली घेऊन तेथील सगळे आवरून पूजा करत असत.’

सौ. प्रीती संकेत कुलकर्णी (साधिका), कोथरूड, पुणे.

१. ‘काकांचे नामस्मरण सतत चालू असते.

२. सुनेला सेवा करून घरी यायला उशीर होणार असल्यास स्वयंपाक करून नातवंडांना वाढणे : ‘काकांचा मुलगा प्रवीणदादा आणि सून रश्मीताई दोघेही साधना करतात. कोरोनामुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीपूर्वी रश्मीताईला सेवा करून घरी यायला विलंब होणार असल्यास काका आमटी-भात किंवा खिचडी करून नातवंडांना जेवायला वाढायचे.

३. गुरुदेवांप्रतीचा भाव : काकांना कोरोना झाला होता. तेव्हा ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे चांगल्या रुग्णालयात चांगले उपचार मिळत आहेत’, असा त्यांचा भाव होता.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.९.२०२१)