नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याविना संघर्ष थांबणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

आझाद मैदान येथे भाजपचे आंदोलन !

मुंबई – देशद्रोही आणि पाकिस्तानधार्जिणे यांच्या विरोधात हा संघर्ष आहे. बाँबस्फोटाचे आरोपी असलेल्यांसह व्यवहार करून कारागृहात गेलेल्या नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. भाजपकडून राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाज मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आदी नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

फडणवीस पुढे म्हणाले की, बाँबस्फोटातील आरोपी शहावली खान याकूब मेमन यांनी बाँबस्फोटाचा कट रचला. सलीम पटेल, दाऊदची बहीण हसिना पारकर यांनीही कट रचला. यांनीच नवाब मलिक यांना भूमी विकली. त्यांच्यासमवेत व्यवहार करतांना तुम्हाला लाज कशी वाटली नाही ? ज्या मुंबईकरांच्या बाँबस्फोटात चिंधड्या उडाल्या, ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली त्यांचे अश्रू दिसले नाहीत का ? पैशासाठी इतके आंधळे झालात का ? जर अनिल देशमुख, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही घेतला जात ? कुणाच्या दाढ्या कुरवाळता, म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाही ?, असा प्रश्‍न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. मुख्यमंत्री  त्यांचा राजीनामा घेऊ शकत नाहीत; कारण राजीनामा घेतला, तर सरकार पडेल, अशी मुख्यमंत्र्यांना भीती वाटते, अशी टीका फडणवीस यांनी या वेळी केली. कालचा ‘पेनड्राईव्ह बाँब’ पहिला बाँब आहे. अजून अनेक बाँब येतील.

आपला संघर्ष पोलिसांसमवेतही नाही. आपण दाऊदविरोधात लढत आहोत, मुंबईविरोधात नाही, दाऊदच्या गुंडाविरोधात हा संघर्ष आहे, असे फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.

सरकारने दाऊदच्या दबावामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय पालटला ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सरकारने त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला; परंतु थोड्या वेळातच हा निर्णय पालटला. हा निर्णय दाऊदच्या दबावामुळे पालटण्यात आला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ‘दाऊदच्या दबावाला घाबरून निर्णय पालटणार्‍या सरकारला घालवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत’, असेही पाटील म्हणाले.

पाटील सत्ताधार्‍यांना उद्देशून म्हणाले की, तुमचे नाव दाऊदशी जोडले गेले आहे. तुम्ही दाऊदला संरक्षण देण्यासाठी त्याला साहाय्य करणार्‍याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘‘या सरकारच्या मंत्रीमंडळातील अस्लम शेख हे ‘मेमनला फाशी देऊ नका’, असे म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यासमवेत बसतात आणि महाराष्ट्र देहलीसमोर झुकणार नाही, असे म्हणतात.’’