ब्रिटनच्या राणीच्या सुरक्षेतील ४ सैनिक युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यासाठी गेल्याची शक्यता !

रशियाने या सैनिकांना पकडल्यास या युद्धात ब्रिटनचा सहभाग असल्यावरून रशियाकडून कारवाईची शक्यता !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (डावीकडे) ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय (उजवीकडे)

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सुरक्षेतील ४ सैनिक युक्रेनमध्ये गेल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दैनिक ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांच्या विरोधात लढण्यासाठी हे ४ सैनिक गेले आहेत. यामध्ये एक जण अल्पवयीन आहे. ‘जर हे सैनिक पकडले गेले, तर ब्रिटनदेखील युद्धात सहभागी झाल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन करतील आणि ब्रिटनच्या विरोधात कारवाई करतील’, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने या चौघांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या सैनिकांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. ब्रिटनच्या एका माजी सैनिकाने युक्रेनच्या बाजूने युद्धात सहभाग घेतला आहे.

ब्रिटनच्या एका माजी सैन्यदल प्रमुखाने म्हटले की, एलिझाबेथ यांच्या सुरक्षेतील सैनिकांचे वागणे दायित्वशून्यतेचे आहे. ते पुन्हा ब्रिटनमध्ये परतल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते.