नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

विधानसभेचे कामकाज ३० मिनिटांसाठी स्थगित !

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी ९ मार्च या दिवशी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी घोषणा देऊन नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी केली. सभागृहात गोंधळ वाढल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेचे कामकाज ३० मिनिटांसाठी स्थगित केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र देण्यासाठी आम्ही सभागृहात वारंवार मागणी केली आहे. सध्या ते कारागृहात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे त्यागपत्र तात्काळ संमत करून त्यांना मंत्रीमंडळातून काढावे. सरकार त्यांचे त्यागपत्र न घेता नवाब मलिक यांच्या पाठीशी रहात आहे. मलिक यांच्या पाठीशी रहाणे म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊदच्या पाठीशी सरकार उभे रहात आहे’, असा विचार समाजात जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे की, सरकारने मलिक यांचे त्यागपत्र घेतले पाहिजे; मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे भाजपच्या संतप्त आमदारांनी या मागणीचा पुनरुच्चार करत विधानसभेत पुन्हा घोषणा देऊन गदारोळ घातला.

सभागृहात विरोधक नसतांना विधानसभेचे कामकाज चालूच !

गदारोळानंतर ३० मिनिटे विधानसभेचे कामकाज स्थगित झाले होते. पुन्हा सभागृहाचे कामकाज चालू झाल्यावर सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता. या कारणास्तव नरहरी झिरवळ यांनी लक्षवेधी न घेता इतर विषयांचे कामकाज चालू ठेवले.