आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवरून सत्ताधार्यांकडून विधान परिषदेत गदारोळ !
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेत ९ मार्च या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था यांवरील चर्चेच्या वेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत ‘जोपर्यंत पडळकर क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही’, अशी भूमिका घेतली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी पडळकर यांनी केलेली विधाने पटलावरून काढून टाकण्याची सूचना केली.
या वेळी सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळामुळे उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी प्रारंभी १० मिनिटे आणि त्यानंतर ७ मिनिटे असे २ वेळा सभागृह स्थगित केले. सभागृह पुन्हा चालू झाल्यानंतर संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांना भाषण करतांना संयम पाळण्याचे आवाहन केले. पडळकर यांनी सभागृहात क्षमायाचना व्यक्त केल्यानंतर उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.