मौजे पाभळ (जिल्हा यवतमाळ) येथील शिधावाटप दुकानावर निलंबनाची कारवाई ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
दुकानावर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता जनतेची असुविधा झाल्याविषयी त्यांना शिक्षाही होणे अपेक्षित आहे ! – संपादक
यवतमाळ, ८ मार्च (वार्ता.) – आर्णी तालुक्यातील मौजे पाभळ (पांढुर्णा) येथील श्रीमती पूजा मनोहर चव्हाण यांच्या शिधावाटप दुकानात अनियमितता आढळून आल्याने त्यांच्या दुकानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
आर्णी येथील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी विधानसभेत ४ मार्च या दिवशी तारांकित प्रश्नोत्तरामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री भुजबळ यांनी लेखी उत्तर दिले आहे.
आर्णी तालुक्यात तांदुळाचा काळाबाजार चालू असून धान्य तस्करांच्या माध्यमातून पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने काळाबाजार होत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले होते. याविषयी पाभळ येथील रहिवाशी वनराज आडे यांनी आर्णी येथील तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली; मात्र तहसीलदार यांनी यावर कोणतीही कारवाई न करता पोलिसात तक्रार देण्यास सांगितले होते. उपरोक्त विषयाला अनुसरून ही कारवाई झाल्याचे लक्षात येते. (तहसीलदारांनी कारवाई का केली नाही ? कि पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि तहसीलदार सर्वजणच या काळ्याबाजारामध्ये सहभागी आहेत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? यामध्ये संबंधित असणार्या सर्वांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक)