राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये उभारणीसाठी ‘हुडको’कडून ४ सहस्र कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
विधानसभा कामकाज
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – राज्यात ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यांच्या जागा रिक्त आहेत त्या सर्व भरल्या जात आहेत. त्यापेक्षा वरच्या श्रेणीतील आधुनिक वैद्यांच्या जागा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरल्या जातात. त्यामुळे त्यांकडे त्यासाठी मागणीपत्र देण्यात आले आहे. ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठीच्या ५० टक्के जागा भरल्या असून उर्वरित जागांसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येतील. राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, तसेच आवश्यक त्या इमारत उभारणीसाठी, दुरुस्तीसाठी ‘हुडको’कडून ४ सहस्र कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली. ते वर्ष २०२१-२२ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील आरोग्य विभागाच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देतांना बोलत होते.
या प्रसंगी काही राज्यातील काही आमदारांनी केलेल्या सूचना, उपस्थित केलेले प्रश्न
१. काँग्रेसचे पुरंदर मतदारसंघातील आमदार संजय जगताप – जेजुरी खंडोबा येथे पोलीस ठाण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. जेजुरी येथे अद्यावत् पोलिसांचे कार्यालय व्हावे आणि तेथे पोलिसांची रहाण्याची सोय व्हावी.
२. भाजप आमदार श्रीमती नमिता मुंदडा – अनेक तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती जुन्या झाल्या असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बीडसाठी पोलीस कर्मचारी वाढवा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिका देण्यात याव्यात.
३. भाजप आमदार मोनिका राजळे, पाथर्डी – ग्रामीण रुग्णालय असूनही रुग्णांची हेळसांड होते, तरी दोन्ही ग्रामीण रुग्णालयांसाठी ‘व्हेंटीलेटर’ उपलब्ध करून द्या.