वनहक्क भूमी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी बांधवांचे आंदोलन !

मुंबई – सरकारने वनहक्क भूमी कायद्याची अंमलबजावणी करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी शेकडो आदिवासी बांधवांनी आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर ७ मार्च या दिवशी आंदोलन केले. लोकसंघर्ष मोर्चा संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, आदिवासींच्या भूमी बळकावल्या जात आहेत. याविषयी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करूनही न्याय मिळत नाही.  आदिवासींच्या भूमी सुरक्षित रहाव्यात यासाठी वनहक्क भूमी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.