महिलांनो, भगवंताची भक्ती करण्याचा संकल्प करूया !
८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ झाला. त्या निमित्ताने…
आजची स्थिती पाहिल्यास बलात्कार, अत्याचार यांमुळे देशात महिला असुरक्षित आहेत. महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात महिला असुरक्षित असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे. यामध्ये मला आलेला अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो. ‘भगवंताची कृपा गुरूंच्या माध्यमातून मी कशी अनुभवत आहे’, हे कृतज्ञताभावाने अर्पण करते.
१. साधनेचा आरंभ
माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सनातन संस्थेचा परिचय झाला. यामध्ये ‘गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आपण आनंदी होतो’, हे समजले. त्यानुसार नामजप, सत्संग, सेवा आणि त्याग या टप्प्यानुसार गुरुदेवांच्या कृपेने साधनेला आरंभ झाला अन् जीवनाचा कायापालटच झाला.
२. साधना करायला लागल्यानंतर जीवन सुंदर आणि आनंदी होणे !
गेली २५ वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जे काही मिळाले, ते शब्दांत व्यक्त करण्यासारखे नाही. याविषयी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. अनेक अनुभूती आल्या. जीवनातील ताण निघून गेला. जीवन अनेक अंगांनी सुंदर आणि आनंदी झाले. ‘कोणत्या समस्येसाठी उत्तर नाही’, असे नाही; कारण अध्यात्म परिपूर्ण शास्त्र आहे. आपण त्यानुसार आचरण केल्यास आपल्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतात, हे अनुभवायला मिळाले. त्यातील काही निवडक अनुभूती, अनुभव सांगते.
२ अ. सेवेच्या अंतर्गत अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी भारतभर भ्रमण केले. यामध्ये बिहारसारख्या राज्यामध्ये एक महिला असून एकटीने प्रवास करावा लागला. या वेळी कधीच आणि कुठेच अडचणी आल्या नाहीत. उत्तरेकडील राज्यांमध्ये रेल्वेवर दगडफेक होणे, महिलांनी एकटीने प्रवास करणे असुरक्षित असणे, असे असतांना गुरुदेवांच्या कृपेने कधीच काही अडचण आली नाही.
२ आ. जीवनामध्ये कोणत्याच प्रसंगाचा ताण येत नाही. भगवंत पाठीशी आहे, हे पदोपदी अनुभवता येत असल्यामुळे मन निश्चिंत झाले आहे.
२ इ. कौटुंबिक, शारीरिक किंवा मानसिक तणावाचे प्रसंग निर्माण होत असले, तरी ते कसे दूर होतात, हे लक्षातही येत नाही. यामध्ये कुणीतरी साहाय्याला येते किंवा स्वतःमध्येच बळ येते आणि प्रसंगातील अडचण सहज सुटून जाते.
धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे साधनेला आरंभ केल्यानंतर भगवंताची कृपा होते. या कृपेमुळेच हे अनुभवता येत आहे. कोणत्याही दृश्य गोष्टींपेक्षा अदृश्य स्वरूपातील भगवंताची कृपा महान आणि किती शक्तीशाली आहे, हे अनुभवायला मिळत आहे.
३. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्या सहस्रो साधिकांनी भगवंताची कृपा अनुभवणे !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सहस्रो साधिका साधना करत आहेत. यामध्ये लहान मुली, तरुण मुली, उच्चशिक्षित महिला, वयस्कर स्त्रिया, गृहिणी अशा देश-विदेशातील महिलांचा समावेश आहे. सर्वत्रच्या साधिका भगवंताची कृपा अनुभवत जीवन आनंदात जगत आहेत. त्या ज्या ठिकाणी आहेत, तेथे त्या खर्या अर्थाने प्रगतीपथावर आहेत, हे नक्की !
४. करिअर करून जे मिळवले असते, त्यापेक्षा अधिक ‘भगवंताच्या कृपे’ने मिळाले !
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय केला असता, तर कदाचित् पुष्कळ पैसा, प्रसिद्धी मिळाली असती; परंतु याहीपेक्षा भगवंताची कृपा मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे जीवनाचे सार्थक झाले, असे वाटते. ‘करिअर’मध्ये यशस्वी व्हायचे असो किंवा नसो, भगवंताची कृपा ही हवीच. त्याच्यामुळे जे आपण साध्य करू शकतो, ते त्याच्याविना नाही हे नक्की !
५. पाश्चात्त्य विचारसरणीमुळे हिंदु स्त्रियांमधील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज लोप पावत असणे !
हिंदु धर्मामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान आहे. पूर्वीच्या काळी मानाचे स्थान मिळवलेल्या सर्व स्त्रिया हिंदु धर्मानुसार आचरण करत होत्या. त्यामुळे त्यांना ‘आम्हाला मान द्या’, हे सांगण्याची वेळ आली नव्हती किंवा ‘स्त्री-पुरुष समानते’साठी संघर्ष करावा लागला नव्हता; कारण धर्मामध्ये शक्ती आहे. पाश्चात्त्य विचारसरणीच्या आहारी जाऊन हिंदु धर्माला बुरसटलेले समजल्यामुळेच स्त्रियांमधील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज लोप पावत चालले आहे.
६. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आध्यात्मिक उन्नती करत असलेल्या साधिका !
सनातन संस्थेच्या माध्यमातून साधिकांनी हिंदु धर्मानुसार पुन्हा एकदा आचरण करून स्वतःतील शक्ती जागृत केलेली आहे. अनेक साधिका संत, सद्गुरु पदापर्यंत पोचलेल्या आहेत. समाजातील लोकांनाही त्यांच्याकडे पाहून वेगळेपण जाणवते आणि ते त्यांच्याकडे मानाने पहातात.
त्यामुळे महिलादिनानिमित्त महिलांनी खर्या अर्थाने मानाने जगण्यासाठी भगवंताची भक्ती करावी !
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |