विरुद्ध दिशेने वाहने चालवणार्यांविरुद्ध गुन्हा नोंद करा ! – संजय पांडे, पोलीस आयुक्त
याविषयी कायद्यात तरतूद असतांनाही असे आदेश देण्याची वेळ का आली, याच्या मुळापर्यंत जाऊन समस्या सोडवणे अपेक्षित आहे ! – संपादक
मुंबई – विरुद्ध दिशेने वाहने चालवणार्या चालकांच्या विरुद्ध थेट गुन्हे नोंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत. याविषयीची माहिती पांडे यांनी ‘फेसबूक लाइव्ह’मध्ये दिली. पांडे प्रत्येक रविवारी मुंबईकरांशी ‘फेसबूक’द्वारे संवाद साधणार असून आठवड्याच्या कामांची माहिती देणार आहेत. या संदर्भात अनेक तक्रारी आल्याने वरील आदेश देण्यात आले आहेत. (वाहतूक पोलिसांनी ही कारवाई करणे हा त्यांच्या कामाचा भाग असतांना त्यांनी नियमितपणे ही कारवाई न केल्याने जनतेकडून या तक्रारी आल्या आहेत. खरेतर या प्रकरणी कारवाईत चालढकल करणार्या कर्मचार्यांवर कठोर करवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
नियम मोडल्यास गाडी कह्यात घेण्यात येणार आहे. चालकाला कायदेशीररित्या न्यायालयासमोर जावे लागेल. विनाहेल्मेट चालकांवरही कारवाई केली जाईल. मुंबईत घरी एकटे रहाणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घरी अंमलदार अधिकारी यांना नियमित जाऊन पाहणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अंमलदार न आल्यास ज्येष्ठ नागरिकांना संपर्क करावा, असे पांडे यांनी सांगितले.
या वेळी पांडे यांनी त्यांचा भ्रमणभाष क्रमांक किंवा फेसबूकवर घोषित करून नागरिकांना त्यावर सूचना करण्याचे आवाहन केले आहे.