अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी खंडणी वसूल करत आहेत ! – संजय राऊत, शिवसेना, खासदार
पंतप्रधानांकडे तक्रार !
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाचे मोठे अधिकारी भाजपचे ए.टी.एम्. मशीन बनले असून काही अधिकारी खंडणी वसूल करत आहेत, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली. ‘ईडी’चा देशातील सर्वांत मोठा घोटाळा उघड केला आहे. पुढील पत्रकार परिषदेत पोलीस अधिकार्यांची नावे घोषित करणार आहे’, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत या वेळी म्हणाले की,
१. जितेंद्र नवलानी ही व्यक्ती ईडीच्या काही अधिकार्यांसाठी काम करत आहे. ज्यांची ज्यांची ‘ईडी’ने चौकशी केली, त्या सर्वांनी त्यांचे पैसे जितेंद्र नवलानी यांच्या आस्थापनांमध्ये हस्तांतर केले आहेत. ‘ईडी’ने धाड टाकताच नवलानी यांच्या ७ आस्थापनांमध्ये कोट्यवधी रुपये हस्तांतर केले जात आहेत. अद्यापपर्यंत १०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक आणि अन्य व्यावसायिक यांनी यांच्या खात्यात पैसे हस्तांतर केले आहेत. या प्रकरणी नवलानी यांच्यासह ४ अधिकार्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
२. वर्ष २०१७ मध्ये ‘ईडी’ने दिवाण हाऊसिंग फायनान्सची चौकशी चालू केली. त्यानंतर दिवाण हाऊसिंगकडून जितेंद्र नवलानी यांच्या आस्थापनात २५ कोटी हस्तांतर झाले. अशाच प्रकारे चौकशी करण्यात आल्यावर ३१ मार्च २०२० पर्यंत एस्.आर्. वाधवान यांच्या आस्थापनाकडून १५ कोटी रुपये, अविनाश भोसले यांच्याकडून १० कोटी रुपये नवलानी यांच्या आस्थापनांमध्ये हस्तांतर करण्यात आले. ‘ईडी’च्या सर्वांत मोठ्या अधिकार्यांचा नवलानींसह काय संबंध आहे ? आणि पैसे त्यांच्या खात्यात हस्तांतर का होत आहेत ?
३. अरविंद भोसले यांनी माझ्या कागदपत्रांच्या आधारे मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांनी या प्रकरणी पडताळणी चालू केली आहे. यामध्ये ‘ईडी’चे ४ अधिकारी कारागृहात जाणार आहेत.