बनावट बियाणे देणार्या पंचगंगा सिड्स आस्थापनाचा परवाना निलंबित ! – कृषीमंत्री दादा भुसे यांची घोषणा
विधानसभा लक्षवेधी…
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – संभाजीनगर जिल्ह्यातील मे. पंचगंगा सिड्स प्रा.लि. या आस्थापनाची कृषी विभागाच्या अधिकार्यांनी पडताळणी केल्यानंतर तेथे भेंडी आणि वांगी यांच्या बनावट बियाण्यांसह ७५ टन बनावट बियाणांचा अवैध साठा आढळून आला. पडताळणीच्या वेळी या आस्थापनाने विक्री परवाना नूतनीकरण केलेला नाही, तसेच तो दर्शनी भागावरही लावलेला नाही. अशा अनेक नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे आमदार अनिल पाटील, महेंद्र थोरवे आणि बालाजी कल्याणकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून ८ मार्च या दिवशी विधानसभेत सरकारच्या निदर्शनास आणून दिले. याला उत्तर देतांना कृषीमंत्री दादा भुसे यांनी ‘बनावट बियाणे आस्थापनाचा परवाना निलंबित केला आहे’, अशी घोषणा सभागृहात केली.
स्थानिक कृषी अधिकार्यांनी मे. पंचगंगा सिड्स प्रा.लि. या आस्थापनातील बनावट बियाण्यांची माहिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा जिल्हा कृषी अधिकारी दिलीप झेंडे यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. त्यामुळे झेंडे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी वरील आमदारांनी सभागृहात केली.
कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘या संदर्भात सचिव स्तरावर चौकशी समिती नेमण्यात येत असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रसंगी फौजदारी गुन्हे नोंद करण्यात येतील.’’ ‘आतापर्यंत बनावट बियाणे विकणार्या ६२० विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, तर १३६ विक्रेत्यांचा परवाना रहित करण्यात आला आहे. अनधिकृत बियाणे आणि किटकनाशके विक्री प्रकरणी चौकशी चालू असून कोणत्याही बियाणे आस्थापनाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केेले.