महाविकास आघाडीच्या काळातील भ्रष्टाचारामुळे ऊर्जाखाते डबघाईला ! – चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – आम्ही सत्तेत आलो तेव्हा महावितरणची १४ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी होती. आम्ही सत्ता सोडली तेव्हा महावितरणची थकबाकी ४२ सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढली. इतकी थकबाकी असूनही महाजनको, महापारेषण आणि महावितरण या तीनही आस्थापने नफ्यात होती. शेतकर्यांकडील वीजदेयकांच्या थकबाकीमुळे नव्हे, तर महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारामुळे ऊर्जाखाते डबघाईला आले आहे, असा आरोप माजी आरोग्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषदेत केला. ८ मार्च या दिवशी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बावनकुळे यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘महापारेषणला वर्ष २०१७-१८ मध्ये ८१५ कोटी, वर्ष २०१८-१९ मध्ये ७४५ कोटी, वर्ष २०१९ मध्ये ४९४ कोटी रुपये नफा होता. महाजनकोला वर्ष २०१७-१८ मध्ये ७०० कोटी, वर्ष २०१८-१९ मध्ये ३३४ कोटी, तर वर्ष २०१९-२० मध्ये १२६ कोटी रुपये नफा होता. महावितरणला वर्ष २०१७-१८ मध्ये ४४२ कोटी, वर्ष २०१८-१९ मध्ये ८४६ कोटी, तर वर्ष २०१९-२० मध्ये २०८ कोटी रुपये नफा होता. ऊर्जा विभागाची ही तीनही आस्थापने भ्रष्टाचारामुळे डुबली आहेत. शेतकर्यांकडून एकही पैसा न घेता वीज दिली, तरी नफा होईल.’’