मार्च २०२२ मध्ये नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता !
‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकित
५ राज्यांच्या निवडणुकीत सत्तांतराची शक्यता
मुंबई – ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवरून मार्च २०२२ या मासात देशात नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता ‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते, तसेच उष्णतेमध्ये वाढ होऊ शकते, असेही यात म्हटले आहे.
मारटकर यांनी या भाकितांमध्ये म्हटले आहे की,
१. पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालांमध्ये विरोधी पक्षांना मोठे यश मिळेल. सत्ताधारी पक्षांना फटका बसेल. काही ठिकाणी सत्तांतर होईल. या काळात हिंसा आणि जाळपोळ होऊ शकते.
२. मोठ्या राजकीय पक्षांत फूट पडण्याची शक्यता आहे.
३. देशात काही ठिकाणी आतंकवादी आणि नक्षलवादी स्फोट घडवण्याचा प्रयत्न करतील.
४. पाक, चीन यांसारख्या शेजारील राष्ट्रांकडून स्फोटक घटना घडवण्याची शक्यता.
५. रेल्वे आणि विमान यांचा अपघात, तसेच आग लागण्याच्या घटना घडतील.
६. बंद, निदर्शने यांमध्ये हिंसा आणि जाळपोळ होण्याची शक्यता आहे.
७. शेअर बाजारात नाट्यमय घटना घडतील. मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील.