मुंबई येथील पुनर्वसनात रखडलेल्या ५२३ झोपडपट्ट्यांसाठी नवी अभय योजना सिद्ध केली ! – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
विधानसभा प्रश्नोत्तरे…
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – मुंबई येथील पुनर्वसनात रखडलेल्या ५२३ झोपडपट्ट्यांसाठी अभय योजना (मिनिटी स्कीम) सरकारकडून सिद्ध करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम संमतीसाठी ही धारिका पाठवण्यात आली आहे. येत्या २ दिवसांत याविषयी निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. कुर्ला (पश्चिम) येथील प्रिमियम आस्थापनाच्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा तारांकित प्रश्न आमदार दिलीप लांडे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी अभय योजना सरकारकडून तयार करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजूरीसाठी ही फाईल गेली असून दोन दिवसात या बाबत निर्णय अपेक्षित आहे, pic.twitter.com/0qXmA3Ct2S
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 8, 2022
या प्रश्नावर उपप्रश्न विचारतांना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबई येथील रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली. आशिष शेलार म्हणाले, ‘‘झोपडपट्टी पुनर्वसनाच्या ४० टक्क्यांहून अधिक योजना अशाच रखडल्या आहेत. यातील वास्तुविशारद (बिल्डर) हे अंमलबजावणी संचालनालय (ईडी), पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा यांच्या विविध चौकशांमध्ये अडकले आहेत. काहीजण कारागृहांत आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासियांची ससेहोलपट होत आहे. मूळ घर तोडले गेले, वास्तुविशारदाकडून २ वर्षांनंतर पुढचे भाडे मिळणे बंद झाले, त्यामुळे त्यांना आता कुणीच वाली उरलेला नाही. अशा वेळी सरकारने काहीतरी योजना सिद्ध करून झोपडपट्टीधारकांना भाडे कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुनर्वसनाचे घर त्यांना मिळावे, यासाठी सरकार काय प्रयत्न करणार ?’’