आदिवासी दुर्गम भागातील विकासकामांविषयी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री
विधानसभा प्रश्नोत्तरे…
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – गारगांव आणि परळी (जिल्हा पालघर) विभागांतील विविध विकासकामांमध्ये झालेल्या अपहार प्रकरणाची रायगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यातील निष्कर्षानुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आदिवासी दुर्गम भागात चांगली कामे होणे ही शासनाची धारणा आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, सुनील राणे आदी आमदारांनी गारगांव आणि परळी विभागांतील विविध विकासकामांविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना चव्हाण बोलत होते.