अंतर्मुखता वाढल्याने मायेतून अलिप्त झालेले संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) !
होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. मायेतून अलिप्त होणे
पूर्वी बाबांचे घरातील गोष्टींमध्ये काही प्रमाणात लक्ष होते. आता ‘त्यांच्यातील साक्षीभाव वाढला आहे’, असे मला वाटले. आता ते व्यावहारिक गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाहीत.
२. ‘त्यांचा आध्यात्मिक त्रास उणावला आहे’, असे मला जाणवले.
३. शांत आणि अंतर्मुख : बाबा पूर्वीपेक्षा शांत आणि अंतर्मुख झाले आहेत.
४. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञताभावाने बोलणे : बाबांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव वाढला आहे. ते पूर्वी मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार सांग’, असे स्थुलातून सांगायचे. या वेळी ते परात्पर गुरुदेवांविषयी कृतज्ञताभावाने बोलत होते.
५. परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच वडिलांमध्ये आमूलाग्र पालट होणे : बाबांची स्थिती पूर्वी अत्यंत बिकट होती. आता त्यांच्यातील पालट पाहिल्यावर ‘वाल्याचे जसे वाल्मीकिऋषि झाले, तसाच पालट बाबांमध्येही झाला आहे’, असे म्हणावे लागेल. ‘बाबांच्या स्वभावात पालट होणे अशक्य आहे’, असे आमच्या घरातील सर्वांना वाटायचे. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच त्यांच्यात हा पालट झाला आहे.’
६. चुकांची जाणीव होऊन त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे : ‘मागील वर्षी रामनाथी आश्रमात आल्यावर एकदा त्यांनी मला मोठ्या आवाजात हाक मारली. तेव्हा लगेच त्यांना ‘मी मोठ्याने बोललो’, याची जाणीव झाली. त्यानंतर ते आश्रमात मोठ्या आवाजात बोलले नाहीत.’
७. आश्रमाप्रतीचा भाव : ‘एकदा बाबा देवद आश्रमात आईला सोडण्यासाठी गेले होते, तेव्हा आश्रमाच्या दारासमोर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. आईने कारण विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘गुरूंच्या आश्रमात नमस्कार न करताच कसा प्रवेश करणार ?’’
८. कृतज्ञताभाव : ‘आश्रमातील संत सहज वावरतात. आपल्याशी सहज बोलतात’, याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते.
९. ‘गजानन महाराजांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आणले आणि महाराज स्वतः पू. सौरभदादांच्या रूपात भेटले’, असे पू. सौरभदादांच्या भेटीत सांगणे : बाबा पूर्वी शेगावच्या गजानन महाराजांचे उपासक होते. पू. सौरभदादांना पाहिल्यावर त्यांना गजानन महाराजांची आठवण झाली. पू. दादाही त्यांना प्रेमाने ‘भाऊ’ म्हणाले. एक मासापूर्वी (महिन्यापूर्वी) पू. दादा ‘भाऊ भाऊ’ म्हणत बाबांना विचारत असल्याचे श्री. जोशीकाकांनी (पू. सौरभदादांचे वडील) सांगितले. ‘गजानन महाराजांनीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आणले आणि महाराज स्वतः पू. सौरभदादांच्या रूपात भेटले’, असा बाबांचा भाव आहे.
१०. ‘वडील शांत आहेत’, असे संत आणि साधक यांनी सांगणे : मागील वर्षी बाबा आश्रमात आले असतांना पू. गाडगीळकाका आणि अनेक साधक यांनी मला सांगितले, ‘‘बाबा पुष्कळच शांत आहेत.’
सौ. सविता तिवारी (श्री. तिवारी यांची पत्नी), संभाजीनगर
१. काटकसरी
१ अ. खाद्यपदार्थ वाया न जाऊ देणे : ‘ते भोजनातील एकही पदार्थ वाया जाऊ देत नाहीत. प्रतिदिन सकाळी जेवतांना आदल्या दिवशीचे खाद्यपदार्थ प्रथम संपवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यानंतरच आवश्यकतेप्रमाणे ते ताजे अन्न घेतात.
२ आ. अनावश्यक व्यय न करणे : पैशाचा अनावश्यक व्यय करणे त्यांना मुळीच आवडत नाही. लहानपणी त्यांनी भाजी विकून आणि कष्टाची कामे करून दिवस काढले आहेत. त्यामुळे ‘आज पैसा असला, तरी तो काटकसरीनेच वापरायला हवा’, असे ते म्हणतात. एखाद्या कामासाठी त्यांना पैसे दिले, तरी ते जपून वापरतात.
३. प्रत्येक कृती ‘सत्यम् शिवम् सुन्दरम्’ करणे : कपड्यांना इस्त्री करतांना कपड्यांची व्यवस्थित घडी करणे, कपाटात सर्व साहित्य ठेवणे, देवपूजा करणे, सुंदर अक्षर काढणे, अशी प्रत्येक कृती ‘सत्यम् शिवम् सुन्दरम्’ करण्याकडे त्यांचा कल असतो.
४. समाधानी वृत्ती : त्यांना पैशांचा मोहही नाही. ‘स्वतःजवळ आवश्यक तेवढे पैसे असले, तरी पुरे’, असा विचार करून ते नेहमी आनंदी असतात.
५. प्रामाणिकपणा
५ अ. पैशांच्या नोंदी प्रामाणिकपणे ठेवणे : ते व्यवहारात प्रामाणिक आहेत. त्यांच्या नोकरीच्या कालावधीत आणि आताही घरच्या पैशांच्या नोंदी प्रामाणिकपणे ठेवतात. मी त्यांना काही रक्कम दिली, तर व्यय झाल्यावर तिचा विनियोग ते मला सांगतात.
५ आ. पंधरा वर्षांपासून प्रामाणिकपणे दैनंदिनी लिहिणे : ते मागील १५ वर्षांपासून प्रतिदिन दैनंदिनी लिहितात आणि त्यात प्रत्येक प्रसंग अन् झालेला व्यय यांची नोंद करतात. त्यामध्ये ते ‘माझ्यावर (पत्नीवर) रागावलो’, ‘मुलावर चिडलो’, असे प्रसंगही लिहितात. ‘हे कुणी वाचले, तर माझ्याविषयी काय विचार करतील ?’, त्याचेही त्यांना काही वाटत नाही.
६. इतरांना साहाय्य करणे : ते समाजातील व्यक्ती, नातेवाइक किंवा मित्र यांच्या मृत्यूपश्चात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणारे साहित्य आणून देऊन नंतर अंत्ययात्रेला आवर्जून जातात.’
७. भाव
७ अ. देवपूजा भावपूर्ण केल्याने पूजेनंतर त्या ठिकाणी प्रसन्न आणि शांत वाटणे अन् भावजागृती होणे : ‘श्री. सत्यनारायण तिवारी यांना देवपूजेची आवड आहे. १२ वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ते दिवसभरातील अनुमाने ४ – ५ घंटे पूजा-पाठ करतात. पूजेमध्ये अथर्वशीर्ष, मारुतिस्तोत्र, नवग्रहस्तोत्र अशा अनेक स्तोत्रांचे प्रतिदिन वाचन करतात. सर्व देवता, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत भक्तराज महाराज यांचा जयघोष करतात. ते आरतीनंतर घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी देवाजवळ प्रार्थना अन् क्षमायाचना करतात. पूजेच्या वेळेत पाहुणे किंवा मित्र आले, तरी ते त्यांच्याकडे अधिक लक्ष देत नाहीत. पूजेनंतर पूजेच्या ठिकाणी प्रसन्न आणि शांत वाटते अन् भावजागृती होते.
७ आ. दूरचित्रवाणीवरील देवतांच्या मालिका पहातांना भावाश्रू येऊन भावविभोर होणे : दूरचित्रवाणीवर देवतांच्या कथांवर आधारित मालिका पहातांना त्यांतील भक्तीचे काही प्रसंग पाहून त्यांची अनेकदा भावजागृती होते. रामायण, श्रीकृष्ण या मालिकांच्या ध्वनीचित्र-चकत्या पहातांना त्यातील श्रीविष्णूचे चतुर्भुज रूप, रामायणातील श्रीरामाचे रूप पहातांना त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येऊन ते भावविभोर होतात.’
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगानंतर जाणवलेले पालट
८ अ. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्याचे प्रमाण न्यून करणे : ‘पूर्वी ते सतत दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघायचे आणि कुणी अडवले, तर चिडचीड करायचे. आता दूरचित्रवाणीवरील ते पहात असलेली मालिका पालटली किंवा दूरचित्रवाणी संच बंद केला, तरी ते शांत असतात.
८ आ. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : पूर्वी त्यांच्याकडून झालेली कोणतीही चूक ते स्वीकारत नसत. आता त्यांना त्यांची चूक सांगितल्यावर ते स्वीकारतात.
८ इ. राग येण्याचे प्रमाण न्यून होणे : पूर्वी ते प्रत्येक गोष्टीत वाद करून भांडण करायचे आणि रागवायचे. आता त्यांना राग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. ते आवश्यक तेवढेच बोलतात. त्यांना आधी ‘तुम्ही तुमचे जेवणाचे ताट वाढून घ्या’, असे म्हटल्यावर राग येत असे; परंतु आता जर मी सेवा करत असेल आणि त्यांना तसे सांगितले, तर ते स्वतःचे ताट वाढून घेतात.
८ ई. पत्नीशी सेवेविषयी बोलणे : मी हिंदी लिखाणाचे भाषांतर करण्याची सेवा करत असतांना ते पूर्वी म्हणायचे, ‘‘घरची कामे करायची सोडून हिंदी भाषांतराची सेवा करत बसते.’’ आता मात्र ते स्वतःहून ‘तुझी सेवा झाली का ? सेवा पाठवली का ? किती राहिली ?’, असे विचारतात.
८ उ. अंतर्मुखता जाणवणे : ‘आधी त्यांना प्रत्येक प्रसंगात इतरांच्या चुका सांगण्याची आणि नावे ठेवायची सवय होती. ते मलाही दिवसभर माझे स्वभावदोष दाखवत असत. आता हा भाग पुष्कळ न्यून झाला आहे आणि ‘ते अंतर्मुख होऊन विचार करतात’, असे मला वाटते.
८ ऊ. अपशब्दांचा वापर करण्याचे प्रमाण उणावणे : त्यांना असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे ते पूर्वी आम्हाला शिवीगाळ करायचे. त्याचे प्रमाण आणि तीव्रता आता न्यून झाली आहे. गुरुकृपेने त्यांच्या वागण्यातील पालटांमुळे आमच्या घरच्या वातावरणातही पुष्कळ पालट जाणवतो.’
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी आलेली अनुभूती – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये परशुराम, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन होणे : ‘गोवा येथील रामनाथी आश्रमात त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. त्या वेळी ते भावावस्थेत होते. त्यांनी सांगितले, ‘‘मला परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये परशुराम, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन झाले अन् पुष्कळ आनंद मिळाला.’’
‘हे गुरुदेवा, हे श्रीकृष्णा, आपल्याच कृपेने त्यांच्यामध्ये पालट होत आहेत. त्यामुळे मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांवर आपली अशीच कृपादृष्टी अखंड राहो, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.’
सौ. भारती मिश्रा (श्री. तिवारी यांची धाकटी मुलगी), संभाजीनगर
१. ‘बाबा कुणाच्याही भावनेत अडकत नाहीत.
२. सहजावस्थेत असणे : त्यांच्यावर कोणत्याही चांगल्या किंवा वाईट घटनेचा परिणाम होत नाही. ते नेहमी सहजावस्थेत असतात.’
श्री. निखिल तिवारी (श्री. तिवारी यांचा मुलगा), संभाजीनगर
१. स्वावलंबी : ‘बाबा स्वतःची सर्व आणि घरातील अनेक कामे स्वतः करतात. त्यांच्या सर्व वस्तू, कपडे आदी स्वतःच व्यवस्थित ठेवतात. ‘इतरांनी त्यांना साहाय्य करावे’, अशी त्यांची अपेक्षा नसते. घरची अनेक कामेही ते स्वतः करतात. घरातील पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी स्वतः भरतात. घरातील प्रसाधनगृहाची स्वच्छता तेच करतात.’
सौ. निधी तिवारी (श्री. तिवारी यांची सून), संभाजीनगर
१ अ. स्वतःच्या आरोग्याची ‘देह देवाचे मंदिर’ या भावाने काळजी घेणे : ‘ते स्वतःच्या आरोग्याची ‘देह देवाचे मंदिर’ या भावाने सतत काळजी घेतात. प्रतिदिन सकाळी फिरायला जातात आणि आल्यावर २ घंटे नियमित व्यायाम करतात. ते रुग्णाईत झाले, तर लगेच औषधेही घेतात.’
१ आ. आवड-नावड न्यून होणे : ‘आधी भाजी करतांना बाबा मला म्हणायचे, ‘‘चांगली खमंग अशी रस्साभाजी कर.’’ मी तशी केली नाही, तर ते मला रागवायचे. आता मी भाजी कशीही केली, तरी ते आवडीने खातात.’ – सौ. निधी तिवारी
कु. कनक मिश्रा (श्री. तिवारी यांची नात)
प्रेमभाव वाढल्याचे जाणवणे : ‘पूर्वी मला ते कुठेही नेत नव्हते; पण आता ‘समवेत येतेस का ?’, असे विचारतात. आता मला कुणी रागावले, तर मला समजावून सांगतात आणि माझे लाड करतात.’
सर्व सूत्रांचा दिनांक (१८.२.२०१९)
|