फरार आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करणार ! – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
विधान परिषद कामकाज तारांकित प्रश्न
शेतात बायोडिझेल सापडल्याचे प्रकरण
अकोला, ८ मार्च (वार्ता.) – अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेने २२ डिसेंबर २०२१ या दिवशी मलकापूर-येवता रस्त्यावरील एका शेतात धाड टाकली. तेव्हा तेथे ५४ सहस्र लिटर बायोडिझेल, साठवण आणि विक्री साहित्य, वाहने अन् इतर साहित्य असा एकूण १ कोटी २६ लाख ४५ सहस्र १०० रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ७ आरोपींना अटक करण्यात आली असून बायोडिझेल व्यवसायासाठी शेत उपलब्ध करून देणारा शेतमालक पसार आहे. या फरार आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
७ मार्च या दिवशी आमदार अमोल मिटकरी आणि त्यांचे सहकारी यांनी अकोला जिल्ह्यात बायोडिझेलचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने शासनाधीन केल्याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे.