बीड जिल्हातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यावरून विरोधकांची सरकारवर जोरदार टीका !

विधानसभा लक्षवेधी….

बीड येथील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात भरदिवसा झालेला गोळीबार, महिलांवरील अत्याचार, अवैध धंदे, चोरी, दरोडे, बँकामधील आर्थिक अपव्यवहार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस अधीक्षकांना आलेले अपयश अशा अनेक प्रश्‍नांविषयी विधानसभेत ७ मार्च या दिवशी लक्षवेधीवर चर्चा करतांना भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल, तसेच येत्या १५ दिवसांत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांद्वारे चौकशी करून दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले. गृहमंत्र्यांकडून समर्पक उत्तर येण्यासाठी भाजपच्या आमदारांना संघर्ष करावा लागला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे यांनी बीड जिल्ह्यातील सुरक्षेसंदर्भात अधिवेशनात लक्षवेधी मांडली. ‘गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. हत्या, बलात्कार, प्राणघातक आक्रमणे, गोळीबार यांसमवेतच वाळू माफियांच्या कारवाया आणि जिल्ह्यातील मशीद, तसेच देवस्थानच्या भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे यांमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयावरील गोळीबार प्रकरणात घायाळ झालेल्यांवर गुन्हे का नोंद केले, त्याची चौकशी करण्यात येईल. वाळू माफियांवर कठोर कारवाई केली जाईल; मात्र कोणत्याही वाळू माफियाला अटक केल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी आमदारांनी मला दूरभाष करू नये.

बीडमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नाही ! – सौ. नमिता मुंदडा, आमदार, भाजप

सौ. नमिता मुंदडा

बीड जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. तेथील अवैध धंदे, तसेच मद्यविक्री आणि मटका व्यवसाय यात पोलिसांचा पूर्णपणे सहभाग आहे. गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहेे. आठवडाभरापूर्वी काही मद्यपींनी माझ्यासमवेत छायाचित्र काढण्यासाठी माझ्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. एक आमदार असून माझ्याविषयी असे घडत आहे, तर सामान्य महिलांच्या सुरक्षितेतचे काय होत असेल ? याविषयी मी पोलीस अधीक्षकांना वारंवार दूरभाष करूनही त्यांनी माझा दूरभाष उचलला नाही.

गृहमंत्र्यांकडून उत्तर मिळण्यासाठी भाजपच्या आमदारांचा विधानसभेत गोंधळ !

विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर गृहमंत्र्यांनी काहीच उत्तर न दिल्याने भाजपच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षासमोरील जागेत येऊन सभागृहात गोेंधळ घातला. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आमदार मुंदडा यांनी वारंवार दूरभाष करूनही पोलीस अधिकार्‍यांनी त्यांचा दूरभाष उचलला नसल्याचे निदर्शनास आल्याचे चौकशीत  स्पष्ट झाले, तर अशा पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.