बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या भूमीच्या अपहाराप्रकरणी १५ जणांवर गुन्हा नोंद ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल, तर वक्फ मंडळाला देण्यात येणारे अनुदान सरकारने त्वरित बंद करावे ! – संपादक
मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या भूमीच्या अपहाराच्या प्रकरणी १५ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत ५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळ आणि देवस्थान यांच्या भूमी लाटण्यात आल्याप्रकरणी चौकशी करण्याविषयी शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी ७ मार्च या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देतांना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली.
वक्फ मंडळाच्या भूमीच्या घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पोलीस पथक नियुक्त करण्याची घोषणा शंभूराज देसाई यांनी मागील वेळी केली होती. याविषयी माहिती देतांना देसाई म्हणाले, ‘‘या प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूल विभागाकडे माहिती मागवूनही त्याच्याकडून कागदपत्रे उपलब्ध झालेली नाहीत. आरोपींमध्ये उपजिल्हाधिकार्यांचाही समावेश आहे. या प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या ५ गुन्ह्यांपैकी ३ प्रकरणे विशेष पोलीस पथकाकडे अन्वेषणासाठी दिली आहेत. उर्वरित २ प्रकरणांचे अन्वेषण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाद्वारे चालू आहे. आवश्यकता वाटल्यास या प्रकरणांचे अन्वेषणही विशेष पोलीस पथकाकडे देण्यात येईल.’’