राज्यातील शेतकर्यांच्या कृषीपंपाची वीजजोडणी तोडण्यावरून विधानसभेत गदारोळ !
विधानसभेचे कामकाज २ वेळा स्थगित
मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावातील शेतकरी सूरज जाधव यांनी फेसबूकवरून त्यांच्या आत्महत्येचे थेट प्रक्षेपण करून आत्महत्या केली. याचे पडसाद ७ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले. कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतीची प्रचंड हानी होत असून शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे सरकारने राज्यातील शेतकर्यांच्या कृषीपंपाची वीजजोडणी तोडू नये, तसेच कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या प्रमुख मागण्यांसाठी विरोधकांनी विधानसभेत गदारोळ केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज प्रथम १० मिनिटे आणि नंतर ३० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. विधानसभेत प्रारंभी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय मांडला. नंतर याच विषयाच्या लक्षवेधी सूचनेवर सभागृहात चर्चा करण्यात आली.
कृषीपंपाचा विद्युत् पुरवठा सुरळीत करा ! – देवेंद्र फडणवीस
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रब्बी हंगामातील पिके जोमात असतांनाच कृषीपंपाचा विद्युत् पुरवठा खंडित केला जात आहे. यांसह थकबाकीपोटी वीजदेयके सक्तीने वसुलही केली जात आहेत. परिणामी शेतकर्यांसमोर दुहेरी संकट ओढावले आहे. यंदा पाणी असूनही केवळ कृषीपंपाचा विद्युत् पुरवठा खंडित केल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे कृषीपंपांची वीजजोडणी न तोडण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी द्यावेत.
वीजदेयक न भरणार्या शेतकर्यांची वीजजोडणी तोडण्यावर ऊर्जामंत्री ठाम !
विरोधकांनी अनेकदा मागणी करूनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘जे शेतकरी वीजदेयक भरणार नाहीत, त्यांची वीजजोडणी तोडण्यात येईल’, असे सांगितले. ते म्हणाले की, शेतकर्यांचे वीजदेयक भरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने सप्टेंबर २०२० अखेर वीजदेयकांच्या रकमेची ४४ कोटी ४९ लाख ४९५ रुपयांची थकबाकी आहे. शेतकर्यांना टप्पाटप्याने वीजदेयक भरण्याची अनुमती देण्यात आली आहे; मात्र वारंवार विनंती करून आणि नोटीस देऊनही वीजदेयक न भरणार्या शेतकर्यांची वीजजोडणी तोडण्यात येत असून ही कारवाई चालूच राहील.