शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण करणार्यांच्या विजयाला ‘शौर्यदिन’ कसे घोषित करू शकतो ? – दिवाकर रावते, शिवसेना
मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – कोरेगाव येथे इंग्रजांच्या समवेत झालेल्या लढाईमध्ये ‘महार रेजिमेंट’ इंग्रजांच्या बाजूने लढले. त्यामुळे महार समाजाला ‘महार रेजिमेंट’चा अभिमान वाटत असेल; मात्र हे चुकीचे आहे. इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण केले होते. त्यामुळे त्यांच्या विजयाला ‘शौर्यदिन’ कसे घोषित करू शकतो ?, असा प्रश्न शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी ७ मार्च या दिवशी विधान परिषदेत उपस्थित केला.
‘या युद्धात स्वराज्याचे ६०० मावळे मारले गेले. शिवरायांच्या मावळ्यांतील तानाजी मालुसरे, बाजीप्रभु देशपांडे आदींनी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले. शौर्यदिन साजरा करायचा असेल, तर त्यांच्या बलीदानाच्या दिवशी साजरा करायला हवा. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या विजयाचा पायंडा आणि त्याचा अभिमान आपण का बाळगावा ?’, असा प्रश्न या वेळी दिवाकर रावते यांनी उपस्थित केला.
१ जानेवारी १८१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे इंग्रज आणि पेशवे यांच्या लढाई झाली. या लढ्यामध्ये पेशव्यांचा पराभव झाला. या वेळी इंग्रजांना ‘महार रेजिमेंट’ने साहाय्य केले. या युद्धात ‘महार रेजिमेंट’च्या मृत्यू झालेल्या सैनिकांच्या गौरवासाठी इंग्रजांनी कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला आहे. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी हा दिवस महाविकास आघाडीने ‘शौर्यदिन’ म्हणून घोषित केला आहे. हे युद्ध पेशव्यांनी लढले. प्रत्यक्षात पेशव्यांच्या सैन्यात मराठ्यांसह विविध जातींचे सैनिक सहभागी होते; मात्र काही जातीयवादी मंडळीनी या युद्धाला ‘ब्राह्मणांविरुद्ध लढाई’ असे स्वरूप दिले आहे. सत्ताधारी पक्षातील नेते असूनही दिवाकर रावते यांनी हे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत विधान परिषदेत व्यक्त केले. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना त्यांनी ही भूमिका मांडली.