शिवोली येथील वसंत विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून नाईट क्लब आणि उपाहारगृहे यांतील संगीतामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याची प्रदूषण मंडळाकडे तक्रार
सायंकाळी ६ वाजता संगीत वाजवण्यास प्रारंभ होऊन ते पहाटे ४ वाजेपर्यंत, तर काही वेळा दुसर्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत चालू असते.
|
शिवोली, ७ मार्च (वार्ता.) – शाळेच्या परिसरात असलेले नाईट क्लब आणि उपाहारगृहे यांनी ध्वनीक्षेपकावरून मोठ्या आवाजात लावलेल्या संगीतामुळे ध्वनीप्रदूषण होते आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो, अशी लेखी तक्रार शिवोली येथील वसंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोवा राज्य प्रदूषण मंडळाच्या सचिवांकडे केली आहे. या शाळेच्या परिसरात असलेली तलाशा हॉटेल, वड्डी, सिओलिम, हिल टॉप, अंजुना आणि इतर उपाहारगृहांच्या विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘‘या उपाहारगृहांकडून ध्वनीक्षेपकावरून लावण्यात येण्यार्या संगीताचा आवाज एवढा मोठा असतो की, त्याचा हृदय आणि कानांवर विपरीत परिणाम होतो.
या संगीतामुळे सर्व परिसरात मोठा गोंधळ असतो. या उपाहारगृहांतून सायंकाळी ६ वाजता संगीत वाजवण्यास प्रारंभ होऊन ते पहाटे ४ वाजेपर्यंत तर काही वेळा दुसर्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत चालू असते. या विषयी अनेक वेळा तक्रार करूनही या उपाहारगृहांच्या चालकांविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. (तक्रार करूनही कारवाई होत नाही; म्हणजे प्रशासनातील अधिकार्यांचे उपाहारगृह चालकांशी साटेलोटे असणार ! – संपादक) अवैधरित्या वाजवल्या जाणार्या या संगीतामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय आल्याने त्याचा परिणाम आमच्या शैक्षणिक कामगिरीवर होत आहे. आम्ही सांगू इच्छितो की, आता काही दिवसांत आमच्या परीक्षा चालू होणार आहेत. त्या काळात संगीत मोठ्या आवाजात वाजवणे असेच चालू राहिले, तर आमच्या शैक्षणिक निकालावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे या तक्रारीची नोंद घेऊन आपण संबंधित उपाहारगृहांच्या मालकांवर कारवाई करावी आणि मोठ्या आवाजात संगीत वाजवू नये, अशा सूचना त्यांना द्याव्यात.’’ यापूर्वीही विद्यार्थ्यांनी या विषयी गोवा राज्य प्रदूषण मंडळाच्या अधिकार्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी नियमांचा भंग करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.