देशातील सर्वांत मोठा औषध निर्माण प्रकल्प रायगड येथे विकसित करण्याचा केंद्रशासनाचा प्रस्ताव !
मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – औषधांमध्ये भारताचे परावलंबित्व अल्प व्हावे, यासाठी केंद्रशासन विशेष प्रयत्नरत आहे. केंद्रशासनाच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाद्वारे रायगड येथे औषध निर्माण उद्योग समूह विकसित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राकडे करण्यात आला आहे. हा प्रकल्प देशातील सर्वांत मोठा औषध निर्माण प्रकल्प ठरणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ७ मार्च या दिवशी विधान परिषदेमध्ये एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
सुभाष देसाई म्हणाले,
१. रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यांतील १७ गावांच्या भूमीवर ‘बल्क ड्रग पार्क’ या नावाने ‘जे.एस्.डब्लू’ उद्योग समूहाद्वारे १ सहस्र ९९३ हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
२. या प्रकल्पासाठी केंद्रशासनाकडून ३ सहस्र कोटी रुपये प्रस्तावित आहेत. केंद्रशासनाकडून प्रकल्प उभारण्याविषयी सातत्याने विचारणा होत आहे. आपण घेतला नाही, तर अन्य राज्ये या प्रकल्पासाठी उत्सुक आहेत.
३. हा प्रकल्प रासायनिक प्रदूषणविरहित आहे. यातून १ लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
४. स्थानिक तरुणांना यातून रोजगार मिळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल.
५. या प्रकल्पामुळे कुणीही निर्वासित होणार नाही. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा.