घटनेच्या वेळी मी देहली येथे असतांनाही माझ्यावर गुन्हा नोंद केल्यास सभागृहातच फाशी घेईन ! – आमदार रवी राणा यांची धमकी
विधानसभेतून…
|
मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – अमरावती येथील महापालिकेच्या आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर पोलिसांनी रवी राणा यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ आणि ३५३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. विधानसभेत ७ मार्च या दिवशी त्याचे पडसाद उमटले. आमदार रवी राणा यांनी ‘मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी दूरभाष करून पोलीस अधिकार्यांवर दबाव आणल्याने माझ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे’, असा आरोप केला. ‘मी घटनेच्या वेळी देहली येथे असतांना माझ्यावर गुन्हा नोंद करत असाल, तर मी विधानसभेतच फाशी घेईन’, अशी धमकी त्यांनी दिली. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘मुख्यमंत्री किंवा मी कुणालाही दूरभाष केलेला नाही. राणा यांच्यावरील गुन्हा नोंद प्रकरणाची चौकशी करण्यात येईल’, असे घोषित केले.
तर पोलीस बेछूट होतील…!
याविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांनी काही केले म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फासावर लटकवाल का ? राणा हे देहली येथे असतांना त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता ३०७ कलमान्वये गुन्हा नोंद केला. या वेळी दूरभाष कुणाचे आले ? आमदार घटनास्थळी नव्हते. ते ४ दिवस देहली येथे होते. तरीही त्यांच्यावर गुन्हा का नोंदवला ? अनधिकृतपणे गुन्हे नोंदवले जात असतील, तर ज्यांनी गुन्हे नोंदवले, अशांवर कारवाई करा. अन्यथा पोलीस बेछूट होतील. आज तुमचे राज्य आहे. एकदा का पोलीस बेछूट झाले, तर या राज्यात काहीच होणार नाही.
पुतळा स्थापनेसाठी अनुमती नव्हती ! – गृहमंत्री
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना विनाअनुमती केली गेली. कोणताही पुतळा बसवण्यासाठी जिल्हाधिकार्यांची अनुमती आवश्यक असते. या पुतळ्याची उंची अल्प असल्याने रस्त्यावरून जातांना कुणाचाही पुतळ्याला धक्का लागू शकतो. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांनी पुतळा काढायचे ठरवले. यासाठी त्यांनी पोलिसांचे संरक्षण घेतले. नियमाप्रमाणे अधिकारात कारवाई केली. महापालिकेच्या आयुक्तांवर ज्या दिवशी शाई टाकली, त्या वेळी पोलिसांना कठोर कारवाई करण्याविना पर्यायच नव्हता. तरीही सदस्यांच्या भावनाशी मी सहमत आहे. परिस्थिती स्फोटक होते, तेव्हा मी माहिती घेत असतो; मात्र कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्या पोलीस महानिरीक्षकांद्वारे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्या संदर्भातील अहवाल आल्यावर विरोधी पक्षनेत्यासमवेत चर्चा केली जाईल.