कोणतीही करवाढ नसलेला ६७३ कोटी रुपयांचा जमेचा कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प नागरिकांसाठी सादर ! – डॉ. कादंबरी बलकवडे, आयुक्त, कोल्हापूर महापालिका
कोल्हापूर, ७ मार्च (वार्ता.) – वर्ष २०१९ मध्ये आलेला महापूर, वर्ष २०२० पासूनचे कोरोनाचे संकट आणि वर्ष २०२१ मध्ये परत आलेला महापूर यांमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकटांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्याचा आढावा घेत कोणतीही करवाढ नसलेला ६७३ कोटी ७० लाख रुपयांचा जमेचा कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प नागरिकांसाठी सादर करण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ७ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
विशेष
१. अद्ययावत् ‘सॅटेलाईट इमेज‘ आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून शहरातील नवीन मिळकतींचा शोध घेण्यात येणार आहे.
२. महापालिका इमारतीमध्ये सुसज्ज ‘ई लायब्ररीज्’, तसेच महिला आणि लहान बालके यांच्यासाठी स्वतंत्र ‘आनंदवाचन कक्ष’ उभारण्याचा प्रस्ताव आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच अन्य कोणत्याही करात वाढ करण्यात येणार नसून कोल्हापूर परिवहन उपक्रमातही वाढ नाही.
अर्थसंकल्पातील काही ठळक तरतुदी
१. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कोटीतीर्थ तलावाचे प्रदूषण अल्प करणे, पुनर्जीविकरण करणे यांसाठी २ कोटी ९५ लाख रुपयांचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. कळंबा ‘फिल्टर’ आणि बावडा ‘फिल्टर’ येथे ‘वेस्ट वॉटर रिसायकलिंग’साठी १ कोटी रुपयांचा प्रकल्प संमत करण्यात आला आहे.
२. स्वत:च्या इलेक्ट्रिक वाहनाकरता ‘चार्जिंग’ स्थानक उभारण्यास आणि त्यातून वाहनधारकांना ‘चार्जिंग’ सुविधा उपलब्ध केल्यास मालमत्ताकरात २ टक्के सूट, तसेच गृहनिर्माण संस्थेत सामायिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास मालमत्ता करात ३ टक्के सूट देण्यात येणार आहे.
३. वातावरणातील धुलीकण अल्प करण्यासाठी बिंदू चौक येथे २९ लाख रुपये व्यय करून ‘व्हर्टीकल गार्डन’ उभारण्यात येणार आहे.
४. काळम्मावाडी थेट पाणीपुरवठा योजना मे अखेर पूर्ण करण्यात येईल.
५. महापालिकेची नवीन इमारत बांधण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद
६. लवकरच महिलांसाठी स्वतंत्र ‘के.एम्.टी.’ बस चालू करण्यात येणार आहे. येणार्या ६ मासांत बसची सर्व माहिती देणारे विशेष ‘भ्रमणभाष ॲप’ विकसित करण्यात येणार आहे. याद्वारे कोणती बस किती वाजता ? कुठे आहे ?, तसेच जवळचे स्थानक यांसह सर्व माहिती मिळेल.