काळानुसार पालटत्या जीवनशैलीचे स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि घ्यावयाची काळजी !
८ मार्च २०२२ या दिवशी असलेल्या ‘महिलादिना’च्या निमित्ताने…
आपण सर्वच जण सध्याच्या पालटलेल्या जीवनशैलीचे परिणाम अनुभवत आहोत. विशेषतः स्त्रियांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात पालट होतांना दिसत आहेत. त्यासाठी वेळीच समुपदेशन (सल्ला) अत्यावश्यक आहे. कुटुंबनियोजनाचा योग्य सल्ला, योग्य वयात गर्भधारणा, नंतरचे आर्थिक आणि कौटुंबिक नियोजन यांसंदर्भात त्यांच्याशी मोकळा संवाद होणे आवश्यक आहे. यासमवेतच पालटत्या जीवनशैलीला दोष देत बसण्यापेक्षा त्यातील अयोग्य गोष्टींवर मात करून चांगल्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेणे, हेच शहाणपणाचे ठरेल.
१. काळाप्रमाणे पालटत्या जीवनशैलीमुळे मुली आणि स्त्रिया यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने त्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागणे
‘डॉक्टर, ही माझी मुलगी गेल्या मासात ८ वर्षांची झाली आहे आणि तिला मासिक पाळी चालू झाली. आता कसे करायचे ?’, ‘मॅडम, माझी मुलगी २५ वर्षांची आहे; पण गेल्या काही वर्षांत तिचे वजन १०० किलोच्या वर गेले असून पाळीही अनियमित आहे’, ‘आमच्या वेळी लग्न झाल्यावर लग्नानंतर पहिल्याच वर्षी मुले व्हायची. आता माझ्या नातीचे ३० व्या वर्षी लग्न झाले असून अजून मूल नकोच म्हणते. आता मुले कधी होणार ? आणि हिचे पुढे कसे होणार ?’, ही अशी अनेक उदाहरणे आम्ही स्त्रीरोगतज्ञ म्हणून गेली काही वर्षे सतत बघत आहोत. हे असे का होत आहे ? याचे उत्तर म्हणजे आपली पूर्णत: पालटलेली जीवनशैली हेच आहे. सध्याच्या काळानुसार जीवनशैली पालटणार, हे जरी खरे असले, तरी काळाप्रमाणे आलेल्या काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी यांमधून आपण कोणत्या गोष्टी अंगीकारतो, त्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. चुकीच्या जीवनशैलीचे दुष्परिणाम लहान मुलींपासून ते वृद्ध स्त्रियांपर्यंत सर्वांवरच दिसत आहेत. लहान मुलींमध्ये उंची आणि वजन याचे प्रमाण वेगाने बिघडत आहे. लहान लहान मुलांचे पोट सुटलेले दिसत आहे. ‘हे धोकादायक आहे’, असे पालकांना वारंवार सांगूनही ते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात.
२. मुलींना पाळी उशिरा चालू होण्यामागील आणि वंध्यत्वाची समस्या वाढीला लागण्यामागील कारणे
मुलींचे वाढलेले वजन, व्यायामाचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, अती खाणे यांमुळे पाळी लवकर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पूर्वी १२-१३ व्या वर्षी येणारी पाळी आता ९-१० व्या वर्षीच येते. पाळी लवकर येणार्या मुलींमध्ये ‘पॉलीसिस्टिक ओव्हरीज’ म्हणजेच अनियमित पाळीची समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. पाळी लवकर चालू होण्यामागे पर्यावरणातील पालट, प्रदूषण, प्लास्टिकचा अतीवापर, ‘प्रोसेस्ड फूड्स’ (प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ) यांसारखे घटकही उत्तरदायी आहेत. याखेरीज बाळ आईच्या पोटात असतांना त्याला मिळणारे पोषण (आई कुपोषित असणे किंवा आईचे अतीवजन असणे) हे सूत्रही महत्त्वाचे आहे.
सध्याच्या जीवनशैलीमध्ये तरुणपिढीचा आयुष्यातील प्राधान्यक्रम पालटला आहे. त्यांच्या दृष्टीने ‘करिअर’ अधिक महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे लग्नाचे वय पुढे जात आहे. साहजिकच मूल होण्याचे वयही पुढे पुढे जात आहे. भारतीय स्त्रियांची जननक्षमता तिशीनंतर काहीशी उतरणीला लागते. त्यामुळे वंध्यत्वाची समस्या वाढीला लागली आहे.
३. लहानपणापासून मुलांना आरोग्य सांभाळायला शिकवणे आवश्यक आहे !
लहानपणापासूनच अभ्यास आणि करिअर यांच्या मागे पळायला शिकवणारे पालक मुलांना स्वत:चे आरोग्य सांभाळायला अजिबात शिकवत नाहीत. त्यामुळे शालेय वयापासून लठ्ठपणाला प्रारंभ होऊन ऐन तरुणपणी अतीलठ्ठपणाकडे वाटचाल करतांना पुष्कळ तरुणी दिसतात. त्यामुळे त्यांचे लग्नही उशिरा होते. वय आणि वजन वाढलेले असल्यामुळे त्या गर्भधारणेसाठी उपचार घ्यायला येतात. वजन अल्प झाल्याखेरीज गर्भधारणा होणे अवघड असते आणि वजन अल्प करायचे म्हटले, तर वय वाढते. अशा कात्रीत रुग्ण आणि आम्ही वंध्यत्वतज्ञ दोघीही सापडलेल्या असतो.
पूर्वीच्याच पद्धतीने गोडधोड खाण्याच्या सवयी चालू ठेवतांना आधीच्या पिढीला शारीरिक कष्ट पुष्कळ अधिक असत, त्यामुळे त्यांनी अधिक खाल्लेले चालायचे. आता घरकामाला बायका, स्वयंपाकघरात विविध यंत्रे, घराजवळच्या ठिकाणी जातांना दुचाकीचा वापर करणे या सगळ्यांमध्ये शारीरिक कष्ट संपल्यात जमा आहेत. दुसरीकडे खाण्याच्या गोष्टींमध्ये प्रचंड प्रमाणात पर्याय उपलब्ध झाले आहेत.
४. स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे घरातील मंडळींनी दुर्लक्ष करणे धोकादायक !
सध्याच्या काळात बहुतांश स्त्रिया चाकरी, घर आणि मुले सगळे सांभाळण्याची कसरत करत असतात. हे करतांना स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे घरातील सर्वांचेच दुर्लक्ष होतांना दिसते. स्त्रिया स्वत:च्या प्रकृतीकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करतांना सर्रास दिसतात. अनियमित पाळी, पाळीमध्ये अतीरक्तस्राव, वारंवार होणारे योनीमार्गातील संसर्ग, कधी कधी स्तनामध्ये येणार्या गाठी अशा गंभीर स्वरूप धारण करू शकणार्या समस्यांकडेही लक्ष दिले जात नाही. कोणत्याही प्रकारचा व्यायाम नाही, आहाराची बंधने न पाळल्यामुळे वाढलेले वजन, त्यामुळे खचलेला आत्मविश्वास आणि आलेले नैराश्य अशा स्त्रिया घरोघरी दिसत आहेत.
पाळी थांबत आलेल्या आणि ‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आलेल्या स्त्रियांच्या समस्याही त्यांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढत आहेत. मुळात पूर्वीच्या मानाने स्त्रियांचे जीवनमान वाढले आहे. साहजिकच पाळी थांबल्यानंतरचे त्यांचे आयुष्यही वाढले आहे. पाळी चालू असेपर्यंत हृदय आणि हाडे यांना ‘हॉर्मोन्स’चे (अंत:स्रावी ग्रंथींचे) संरक्षण असायचे की, जे ‘मेनोपॉज’नंतर संपते. मग प्रकृतीची योग्य काळजी न घेतल्यास हृदयविकार, हाडांचे विकार, मधुमेह, रक्तदाब असे विविध आजार आक्रमण करण्यासाठी टपलेले असतात. आता मुले मोठी होऊन लांब निघून जाण्याचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या एकट्या पडलेल्या स्त्रिया मानसिक आजारांनाही बळी पडतांना दिसत आहेत. एकंदरीत लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत पालटलेल्या जीवनशैलीचे स्त्रियांच्या आरोग्यावर पुष्कळ दूरगामी दुष्परिणाम होत आहेत. हे थांबवण्यासाठी काय करता येईल, ते पहाणे आवश्यक आहे.
५. स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम थांबवण्यासाठी करावयाचे उपाय
अ. सर्वप्रथम लहानपणापासूनच मुले-मुली यांना नियमित व्यायामाची सवय लावली पाहिजे. अलीकडे अनेक पालक त्यांच्या मुलांना सतत अभ्यासाच्या मागे लावून त्यांचा खेळ, परिणामी व्यायाम आधी बंद करतात. मुलींच्या सर्वांगीण वाढीसाठी त्यांनी भरपूर खेळणे आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून त्यांचा भावनिक विकास होतो.
आ. मुला-मुलींना खाण्याच्या योग्य सवयी लावणे अतिशय आवश्यक आहे. त्यांना अतीखाणे, सतत गोड खाणे आणि अधिक कॅलरीजचे पदार्थ खाणे यांची सवय लागली, तर कितीही व्यायाम केला, तरी त्यांचे वजन वाढतच जाणार आहे.
सध्या एकच मूल हा ‘ट्रेंड’ असल्यामुळे अतीलाड आणि शिस्तीचा अभाव हे चित्र सर्रास दिसते; पण हे मुला-मुलींच्या अनारोग्याला कारणीभूत ठरणार आहे, याची जाणीव पालकांमध्ये असलीच पाहिजे.
इ. पाळी चालू होण्याच्या वयात मुलींच्या वाढीकडे विशेष लक्ष द्यावे. वाढत्या वजनासमवेतच पाळी चालू होण्याआधीची लक्षणे पुष्कळ लवकर चालू होत नाहीत ना, याकडेही लक्ष द्यायला हवे. मुलींमध्ये स्तनाची वाढ चालू झाल्यावर १-२ वर्षांत पाळी चालू होऊ शकते. ‘ही वाढ फार लवकर चालू होते आहे’, असे वाटल्यास आधुनिक वैद्यांचा सल्ला लगेच घ्यावा.
पाळी चालू झाल्यावर ती १ ते २ वर्षे अनियमित असू शकते. त्यानंतरही ती अनियमित राहिल्यास आणि रक्तस्राव अधिक किंवा फारच अल्प असल्यास स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. पाळी चालू झाली; म्हणून मुलींचा खेळ आणि व्यायाम कधीही बंद करू नये. ही सर्वांत मोठी चूक ठरू शकते.
ई. लग्नाच्या वयाच्या मुला-मुलींना त्यांच्या पुढच्या आयुष्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने वेळीच सल्ला अत्यावश्यक आहे. कुटुंब नियोजनाचा योग्य सल्ला, योग्य वयात गर्भधारणा, तसेच नंतरचे आर्थिक आणि कौटुंबिक नियोजन यासंदर्भात त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद होणे आवश्यक आहे.
६. पालटत्या जीवनशैलीला दोष देत बसण्यापेक्षा त्यातील अयोग्य गोष्टींवर मात करून चांगल्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घ्या !
लग्नानंतर स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे, हे कुटुंबाचे दायित्व आहे. तिला स्वत:साठी हक्काचा वेळ मिळणे आवश्यक आहे, ही जाणीव हवी. स्त्रियांनीही नियमित व्यायाम आणि योग्य आहार सांभाळला, तर त्यांचे अन् पूर्ण कुटुंब यांचे आयुष्य कितीतरी अधिक समृद्ध होऊ शकेल. ‘आमच्या वेळी असं नव्हते हो’, असे सतत घोकणार्या ज्येष्ठ नागरिकांनीही नवे पालट अधिक सकारात्मक रितीने स्वीकारायला हवेत. शेवटी जीवनात सतत पालट होणे, हेच शाश्वत सत्य आहे. त्यामुळे पालटत्या जीवनशैलीला दोष देत बसण्यापेक्षा त्यातील अयोग्य गोष्टींवर मात करून चांगल्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेणे, हेच योग्य नाही का ?
– डॉ. (सौ.) शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्वतज्ञ
(साभार : विवेक मराठी, १८.१२.२०२१)