पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी ३५ मिनिटे साधला संवाद !

(डावीकडून) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्याशी दूरभाषवर ३५ मिनिटे चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील पालटत्या परिस्थितीवर चर्चा केली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या साहाय्यासाठी झेलेंस्की यांचे आभार मानले. यासह पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या सुमी शहरामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारकडून पाठिंबाही मागितला आहे.

भारताकडून दिल्या जाणार्‍या साहाय्यासाठी भारताचा कृतज्ञ ! – झेलेंस्की

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चर्चा केल्यासाठी आभार व्यक्त केले. झेलेंस्की यांनी म्हटले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या आक्रमक कारवाईवर युक्रेनकडून देण्यात येणार्‍या उत्तराविषयी माहिती दिली. या वेळी मोदी यांनी युद्धाच्या वेळी भारतीय नागरिकांना युक्रेनकडून करण्यात आलेल्या साहाय्यासाठी कौतुक केले. युक्रेनच्या जनतेला भारताकडून दिल्या जाणार्‍या साहाय्यासाठी युक्रेन भारताचा कृतज्ञ आहे.

पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी केली ५० मिनिटे चर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरभाषवर ५० मिनिटे चर्चा केली. या वेळी मोदी यांनी पुतिन यांना युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आवाहन केले. मोदी यांनी युक्रेनच्या काही भागांमध्ये रशियाने केलेला युद्धविराम आणि युद्धात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सिद्ध केलेला ‘मानवतावादी मार्ग’ (ह्युमेनिटेेरियन कॉरिडोर) यांचे कौतुक केले आहे. यासह उभय नेत्यांमध्ये युक्रेनच्या परिस्थितीवर चर्चा झाली. पुतिन यांनी मोदी यांना युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाटाघाटींच्या स्थितीविषयीची माहिती दिली, असे वृत्त ‘ए.एन्.आय.’ वृत्तसंस्थेने दिले आहे.