अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने दिले आहेत. आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी नवाब मलिक यांची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात दिली. आता मलिक यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात होणार आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला कह्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या अनुमाने ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा व्यवहार करणार्‍या आस्थापनाशी नवाब मलिक यांचा संबंध असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाला पडताळणीत आढळले. त्यानुसार संचालनालयाने मलिक यांना २३ फेब्रुवारी या दिवशी अटक केली होती.