भ्रष्टाचाराचे ‘चित्रां’कन !
भ्रष्टाचार्यांप्रमाणेच त्यांना पाठीशी घालणार्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एन्.एस्.ई.च्या) माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी अटक केली. हे कधीतरी होणारच होते किंबहुना त्यास विलंब झाला, असेच म्हणावे लागेल. वर्ष १९९२ मध्ये हर्षद मेहता याने मुंबई शेअर बाजारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्यानंतर शेअर बाजारात अधिक पारदर्शकता यावी आणि या क्षेत्रात ग्राहकांची फसवणूक होऊ नये; म्हणून राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना करण्यात आली. त्याच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण वाटा असलेल्या व्यक्तींमध्ये चित्रा रामकृष्ण यांचे नाव अग्रेसर होते. थोडक्यात भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी ज्यांना त्या पदावर बसवण्यात आले, त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटले. ही भारतीय व्यवस्थेची शोकांतिका म्हणावी लागेल. आज अनायसे जागतिक महिलादिन आहे. आजच्या दिवशी स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने किंवा पुरुषसत्ताक समाज महिलांवर करत असलेल्या कथित अत्याचारांविषयी चर्चासत्रे झोडली जातील. असे करणार्या समस्त स्त्रीवाद्यांनी चित्रा रामकृष्ण यांच्यासारख्या भ्रष्ट स्त्रियांवरही भाष्य करण्यास पुढे यायला हवे. शेअर बाजार हे तसे पुरुषांचे क्षेत्र. सनदी लेखापाल असलेल्या चित्रा रामकृष्ण यांनी या क्षेत्रात पाय रोवला. याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या पुरुष सहकार्यांच्या साहाय्याने ‘खाबूगिरी’ केली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर त्यांच्यापेक्षा वरचढ ठरून चित्रा रामकृष्ण यांनी या क्षेत्रात भ्रष्टाचार केला. ‘स्त्री ज्या क्षेत्रात नेतृत्व करते, तेथे भ्रष्टाचाराला थारा नसतो’, असा (खोटा) समज काही स्त्रीवाद्यांकडून पसरवला जातो. त्यांना चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे चपराक बसली आहे. काही वर्षांपूर्वी आय.सी.आय.सी.आय.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनाही गैरकारभार केल्यानंतर डच्चू देण्यात आला. यामुळे आर्थिक क्षेत्रात महिलेने केलेल्या भ्रष्टाचाराचे चित्रा रामकृष्ण यांच्या रूपाने दुसरे प्रकरण पुढे आले आहे. भ्रष्टाचार स्त्री किंवा पुरुष दोन्हीही करू शकतात. त्यामुळे कुठलेही क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी नीतीवान उमेदवाराची निवड होणे का आवश्यक आहे ? हे चित्रा रामकृष्ण प्रकरणातून अधोरेखित होते.
‘सेबी’ला जाब विचारा !
चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या घोटाळ्याला ‘को लोकेशन’ घोटाळा म्हटले जाते. आर्थिक क्षेत्राचे वार्तांकन करणार्या ‘मनीलाईफ’ने हा घोटाळा वर्ष २०१५ मध्ये प्रथम निदर्शनास आणला. या घोटाळ्यावर प्रकाश टाकणे हे ‘मनीलाईफ’साठीही सोपे काम नव्हते; कारण याविषयी वृत्त दिल्यावर ‘मनीलाईफ’वर एन्.एस्.ई.ने मानहानीचा दावा प्रविष्ट केला; मात्र हा दावा फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाने एन्.एस्.ई.ला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. यानंतर एन्.एस्.ई.च्या संबंधितांना त्यागपत्र द्यावे लागले. त्याच वेळी एन्.एस्.ई.ने सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई का नाही केली ? आता ७ वर्षांनी या घोटाळ्यातील प्रमुख आरोपीला अटक होत आहे. त्यानंतर त्यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट होणार, मग खटला वर्षानुवर्षे न्यायालयात चालणार आणि त्यानंतर शिक्षा होण्यासाठी बरीच वर्षे जातील. आर्थिक क्षेत्रातील घोटाळ्यांमध्ये जर इतक्या कूर्मगतीने संबंधितांवर कारवाई होत असेल, तर या क्षेत्रात गुंतवणूक करणार्या सामान्य लोकांवर हा अन्याय आहे.
याही पुढे जाऊन ‘सेबी’ (सिक्युरिटिज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) काय करत होती ? वर्ष २०१५ मध्येच हा घोटाळा समोर आल्यावर सेबीने काय पावले उचलली ? ‘या प्रकरणात काही जणांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होऊनही सेबी संबंधितांशी नरमाईने वागली’, असे मत काही दिवसांपूर्वी चित्रा रामकृष्ण यांना जामीन नाकारतांना सीबीआय न्यायालयाने नोंदवलेले आहे. न्यायालयाने सीबीआयवरही ताशेरे ओढले आहेत. सध्या चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी चर्चा होत असतांना कर्तव्यात कुचराई करून एक प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालणार्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे.
प्रसारमाध्यमांची उदासीनता !
चित्रा रामकृष्ण यांनी त्यांच्या पदाचा चुकीचा वापर करून शेअर्सविषयी गोपनीय माहिती काही आस्थापने आणि ‘ब्रोकर’ यांना दिली. यामुळे संबंधितांना कोट्यवधीचा लाभ झाला. हर्षद मेहता घोटाळा किंवा ‘को लोकेशन’ घोटाळा हा प्रत्यक्ष दिसून येत नाही. हर्षद मेहता घोटाळ्यावर प्रकाश टाकणार्या पत्रकार सुचिता दलाल यांच्या म्हणण्यानुसार ‘हर्षद मेहता घोटाळा समोर आल्यावर हा आर्थिक घोटाळा कसा आहे ? हे अन्य प्रसारमाध्यमे, राजकारणी यांनाही बराच काळ समजून सांगावे लागले होते.’ त्यामुळे ‘को लोकेशन’ घोटाळ्यामुळे किती हानी झाली, हे समजायला वेळ लागेल. वर्ष २०१९ मध्ये दबाव वाढल्यावर एन्.एस्.ई.ने चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी यांना ६२४ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला होता. जर दंडाची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये असेल, तर त्यांनी केलेला घोटाळा किती कोटी रुपयांचा असेल ? याचा विचार आपण करू शकतो.
हा घोटाळा लपवण्यासाठी चित्रा रामकृष्ण यांनी ‘हिमालयातील एका योग्याने मला गोपनीय माहिती देण्यास सांगितली’, अशा आशयाचे वक्तव्य केले. साधारण मासाभरापूर्वी ही बातमी प्रसारित झाली. त्या वेळी चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या घोटाळ्यावर प्रकाश टाकण्याऐवजी ‘हा हिमालयातील योगी कोण ?’, असा प्रश्न विचारत या अस्तित्वात नसलेल्या योग्यावर प्रसारमाध्यमांनी टीका केली. त्या वेळी ‘हिंदु योगी घोटाळे करण्यास उद्युक्त करतात’ किंवा ‘ध्यानधारणा करण्याऐवजी पैसे खातात’, असा सूर आळवून चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केले गेले. काही दिवसांनी असा कुणी योगी अस्तित्वात नसून हा योगी म्हणजे चित्रा रामकृष्ण यांचे भ्रष्ट सहकारी आनंद सुब्रह्मण्यम् होते, असे पुढे आले. त्यामुळे हिंदुद्वेषाने पछाडलेली प्रसारमाध्यमे नाकावर आपटली.
चित्रा रामकृष्ण यांनी स्वतःची कुशाग्र बुद्धी आणि क्षमता विधायक कार्यासाठी न वापरता विघातक कामांसाठी वापरली. असे ‘बुद्धीवान’ भ्रष्टाचारी हे भारतीय व्यवस्थेसाठी अधिक धोकादायक आहेत, हे लक्षात घ्या !